बेळगाव लाईव्ह :हालगा -बेळगाव सर्व्हिस रोड दुरुस्तीच्या मागणी संदर्भात शनिवारी निवेदन देताच आज सोमवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली असून बेळगावचे नवे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या पद्धतीने वेगाने जनतेच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
हालगा येथील कामगार, महिला व ग्रामस्थांच्यावतीने गेल्या शनिवारी ॲड. अण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) निवेदन सादर करण्यात आले होते.
वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी हालगा -बेळगाव सर्व्हिस रोडवरील धोकादायक खड्डे बुजवून या रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच या ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि सिग्नल बसवण्याच्या माध्यमातून तात्काळ सुरक्षा उपाय हाती घेण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. बस्तवाड, हालगा ते बेळगाव सर्व्हिस रोडवरील मंजुनाथ राईस मिल व होल्कास वॉगन कार शोरूम समोर वरचेवर अपघात घडत असल्याने तेथे स्पीड ब्रेकर व सिग्नलसह इतर व्यवस्था करावी.
त्याचप्रमाणे महालक्ष्मी रोडलाईन्स वर्कशॉप समोर पडलेले मोठे खड्डे त्वरित बुजवावेत. यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देण्यात यावेत, अशी विनंती निवेदन देताना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली होती.
हालगा ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तात्काळ हालगा ते बेळगाव सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज सोमवार सकाळपासून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
या पद्धतीने आपल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल हालगा येथील कामगार, महिला व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना दुवा देत आहेत.