बेळगाव लाईव्ह : मुसळधार पावसाने बेळगाव शहर परिसरातील जनजीवन विस्कळीत केले असून अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरूच आहे. अशावेळी दखल घेण्यासाठी हेस्कॉम किंवा वनविभागाकडे तसेच आपत्ती निवारण कक्षाकडे दाद मागण्यासाठी नागरिक धावतात.
परंतु गोवावेस येथील हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयात कर्मचारीच उपलब्ध नसल्याचे निदर्शनात आले आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी हि बाब निदर्शनात आणली असून तक्रार देण्यासाठी गेले असता या कार्यालयात कुणीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. या कार्यालयात केवळ बिल वसुली करणारे कर्मचारी काही काळ हजर होते.
मात्र त्यांच्या रजेनंतर संपूर्ण कार्यालय उघडेच असून नागरिकांची तक्रार घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी एकही कर्मचारी याठिकाणी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यालयात ना तक्रार घेण्यासाठी कुणी आहे ना इतर कोणत्या सुविधा पुरविण्यासाठी कुणी कर्मचारी आहे. अशा परिस्थितीमुळे हे कार्यालय वाऱ्यावर पडल्याचे चित्र दिसत असून नागरिकांनी हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयाच्या या कारभावर नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच तातडीने या कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.