बेळगाव लाईव्ह :दुथडी भरून वाहणारी घटप्रभा नदी आणि पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे गोकाक येथील धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची वाढती गर्दी होत आहे.
गोकाक येथील घटप्रभा नदीस आलेल्या पुराच्या पाण्याने गेल्या वीस दिवसांपासून गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या हा धबधबा पूर्ण क्षमतेने रोरावत खाली कोसळत आहे. धडकी भरवणारा सदर 171 फूट उंचीवरून खाली कोसळणारा 581 फूट रुंदीचा प्रचंड जलप्रपात पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गोकाक फॉल्सकडे धाव घेत आहेत. त्यामुळे गोकाक फॉल्स येथे हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी होताना पहावयास मिळत आहे.
तथापि प्रशासनाने धबधब्यासह घटप्रभा नदी किनाऱ्यावर जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
सध्या घटप्रभा नदीतून 30 हजार क्युसेक पाणी वाहून येत असले तरी हे पाणी हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयाच्या ठिकाणी अडविण्यात आले आहे. हिडकल जलाशयामध्ये सध्या एकूण क्षमतेच्या 70 टक्के साठा जमा झाला आहे.
हिरण्यकेशी नदीद्वारे सध्या गोकाक येथील घटप्रभा नदीतून वीस हजार क्युसेक्स पाणी गोकाकच्या धबधब्यावरून खाली कोसळत आहे. निसर्गप्रेमींसाठी हा धबधबा पाहणे म्हणजे एक पर्वणीच ठरली आहे. तथापी धबधब्याजवळ जाण्यास बंदी असल्यामुळे बहुतांश पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.