बेळगाव लाईव्ह : गांधीनगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जय किसान भाजी मार्केट नजीक असलेल्या गटारींमधून कचरा, भाजीपाला साचल्याने गटारीत पाणी रस्त्यावरून वाहून आले असून साधारण गुडघाभर पाणी साचले आहे. महामार्गावरील सर्व्हिस रोड लगतच्या गटारींमध्ये कचरा तुंबल्याने पाण्याचा निचरा होईनासा झाला असून येथील बहुसंख्य व्यावसायिकांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.
२०००-२००२ या कालावधीत या भागातील महामार्गाचे कामकाज पूर्ण झाले. त्यावेळी असलेली रस्त्याची साधारण ३ फूट उंची आता १५ फुटांनी वाढविण्यात आली आहे. अयोग्य नियोजनामुळे पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हि समस्या नेहमीचीच झाली असून या भागातून वाहणारा बेळ्ळारी आणि लेंडी नाल्याचेही योग्य नियोजन नसल्याने आसपास परिसरातील शेतजमिनींना याचा फटका बसतो आहे.
नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी ज्या पाईप घालण्यात आल्या आहेत यातील सर्व पाईप तुंबलेल्या आहेत. पाइपमधील गाळ काढून त्या खुल्या करून पाण्याला वाट करून देणे गरजेचे आहे. याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली . परंतु या निवेदनांना केराची टोपलीच आजवर दाखविण्यात आल्याचा आरोप या भागात राहणाऱ्या नागरिकांनी, व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी केला आहे.
या परिसरातून वाहणारे पाणी पुढे बेळ्ळारी नाल्याला जाऊन मिळते. मात्र पाईप मुजल्याने हे पाणी रस्त्यावर वाहत असून पाण्याला पुढे जाण्यासाठी कोणतीच वाट नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात येथील पाणी रस्त्यावर साचते. अलीकडेच या भागातील १ पाइपमधील गाळ काढून पाईप स्वच्छ करण्यात आली. मात्र पाण्याचे प्रमाण पाहता केवळ एकाच पाईप मधील गाळ काढणे पुरेसे नाही. या भागात साचणारे पाणी पुढे समर्थ नगर भागात वाहत जाते. आणि यामुळे समर्थ नगर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलावाप्रमाणे भासते.
२००८ पासून या समस्येविषयी सातत्याने प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली होती. मात्र हि समस्या सोडविण्यात प्रशासन कुचकामी ठरले आहे. हे पाणी जर अशाच पद्धतीने साचत राहिले तर केवळ हाच भाग नव्हे तर संपूर्ण बेळगाव शहराला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. बळ्ळारी आणि लेंडी नाल्याचे अयोग्य नियोजन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कारभार यासाठी जबाबदार असून गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे पुन्हा या भागात पाणी साचल्याने जिल्हाधिकाऱ्यांना याठिकाणी पाचारण करण्यात आले. येथील परिस्थिती समजावून सांगण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी करून सोमवारी जागेवर येऊन पाहणी करून या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
या भागातील समस्येवर जर तातडीने तोडगा काढण्यात आला नाही तर तब्बल ५ हजार एकर भातपिके पाण्याखाली येऊन पिकांचे नुकसान होणार आहे. यंदा शेतीसाठी पूरक पाऊस होऊनही शेतकरी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नुकसान झेलणार आहेत. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि बेजबाबदारपणामुळे बेळ्ळारी आणि लेंडी नाल्याच्या पाण्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून या समस्येवर तातडीने तोडगा न काढल्यास हि समस्या संपूर्ण बेळगाव शहरासाठी नुकसानकारक ठरेल, अशी भीती या भागातील नागरिकांनी, व्यावसायिकांनी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.