बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली असून अजूनही काही भागात अतिवृष्टीमुळे आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे सीमावर्ती भागातील नदीकाठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंबीयांना घरे सोडून स्थलांतरित व्हावे लागले असून नदीकाठावरील पुराचा धोका मात्र अद्याप कायम आहे.
२२ जुलैपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने सलग ८ दिवस बेळगावसह अनेक भागाला झोडपून काढले. यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. सध्या पावसाचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी महाराष्ट्रातून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे अद्याप नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. यामुळे पूरस्थिती अद्याप कायम असल्याचे जाणवत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण पाहता २८ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अथणी ८२.६ मिमी , बैलहोंगल २१४.० मिमी, बेळगाव ७५४.७ मिमी, चिक्कोडी ३०९.९ मिमी, गोकाक १२५.७ मिमी, हुक्केरी २१०.० मिमी, कागवाड १८३.१ मिमी, खानापूर १२७५.४ मिमी, कित्तूर ५६५.० मिमी, मूडलगी ७५.१ मिमी, निपाणी ४३९.६ मिमी, रायबाग ९९.५ मिमी , रामदुर्ग ६९.५ मिमी, सौंदत्ती १४७.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जुलै महिन्यात अतिरिक्त पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी आणि जलाशयातही अतिरिक्त पाणी साठा झाला आहे. दरम्यान खबरदारी म्हणून जलाशयातील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठावरील पूरस्थिती कायम आहे. पाऊस गेल्यानंतरदेखील चार दिवसांनंतर पूर परिस्थिती जैसे थे आहे.
पाऊस न झाल्यास पूर ओसरायला अद्याप आठवड्याचा कालावधी लागेल, असे वाटत आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे जून महिन्यात पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले होते. मात्र जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. गतवर्षी कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात नदी काठावरदेखील भात रोपांची लागवड केली असली तरीही यंदा जुलै महिन्यात अति पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
मागील आठ दहा दिवसांपासून नदी काठाच्या शिवारात पाणी साचून असल्याने पिके कुजण्याची चिंता व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी पूरपरिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पूर कधी ओसरतोय याकडे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.