बेळगाव लाईव्ह:गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरवर्षीप्रमाणे बळ्ळारी नाल्याला पूर आला आहे. नाल्याच्या पात्रा बाहेर पडलेल्या पाण्यामुळे आसपासची हजारो एकर शेतजमीन जलमय होऊन भात वगैरे पिके संपूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या पद्धतीने पिकासाठी घेतलेले श्रम आणि खर्च केलेला पैसा पाण्यात गेल्याने बळ्ळारी नाला हा पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी वरदान नव्हे तर शाप ठरला आहे.
बेळगाव शहरालगतच्या बळ्ळारी नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात येणारा पूर म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठे संकट असते. यंदा देखील गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे या नाल्याला पूर आला आहे.
नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात पात्रा बाहेर पडल्याने आसपासचा परिसर संपूर्णपणे जलमय झाला आहे. नाल्या शेजारील आसपासच्या शेत जमिनीतील संपूर्ण भात पीकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे बळ्ळारी नाल्या शेजारील शिवारांना सध्या विस्तीर्ण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरवर्षी याच पद्धतीने नाल्याला पूर येऊन येथील शेतकरी देशोधडीला लागत आहे. यंदा देखील नुकतीच लावणी केलेले संपूर्ण भात पीक पुराच्या पाण्याखाली जाऊन नष्ट झाले आहे. येळूर रोड वरील श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये देवाच्या पायापर्यंत बळ्ळारी नाल्याच्या पुराचे पाणी शिरले आहे. बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे सध्या अनगोळ, वडगाव, शहापूर, माधवपुर, जुने बेळगाव, हलगा, बेळगाव त्याचप्रमाणे हुदली पर्यंतच्या नाल्यालगतच्या दोन्ही बाजूच्या 5 कि.मी. परिसरातील शेतपिकं नष्ट झाली आहेत.
शहापूर शिवारातील पुराचे पाणी बळ्ळारी नाल्यापासून 2 कि.मी. अंतरावर असलेल्या हालगा -मच्छे बायपास रस्त्यापर्यंत गेले आहे. त्याचप्रमाणे हे पाणी बायपास वरून वाहत असल्यामुळे पलीकडची शेतपिकही पाण्याखाली गेली आहेत. शहापूर शिवारातील जवळपास 400 ते 500 एकर शेत जमीन पाण्याखाली गेली आहे.
बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील संपूर्णपणे जलमय झालेल्या शेतजमिनींमध्ये आता यानंतर भाताचे पीक तर घेता येणारच नाही. तरी याची गांभीर्याने दखल घेऊन सरकार त्याचबरोबर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बेळगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी कळकळीची विनंती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कर्नाटकातील विद्यमान सरकारला शेतकऱ्यांनी निवडून दिले आहे. तेंव्हा या सरकारने शेतकऱ्यांना समजून घ्यायचे असेल तर ताबडतोब बेळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी विनंती शेतकरी नेते राजू मरवे यांनी देखील केली आहे.