Sunday, November 24, 2024

/

बळ्ळारी नाल्यासंदर्भात निर्णायक लढा देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गेल्या बऱ्याच वर्षापासून बळ्ळारी नाल्याची स्वच्छता आणि विकासासंदर्भात वारंवार निवेदनं आणि लढा देऊनही सरकार त्याची दखल घेत नसल्यामुळे आता संघटितपणे निर्णायक लढा देण्यासाठी प्रथम जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन सादर करण्याचा व त्यानंतर गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय बळ्ळारी नाला परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांनी घेतला आहे.

दरवर्षीप्रमाणे यावेळीही सध्याच्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर येऊन हजारो एकर शेत पिकाचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर वडगाव येथे आज सोमवारी सकाळी शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बळ्ळारी नाल्यामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती, तसेच नाल्याची स्वच्छता आणि विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी उपस्थित शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी आपापली मते मांडली. चर्चेअंती सदर नाल्याची युद्धपातळीवर साफसफाई आणि विकास करण्याकडे प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निर्णायक लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वप्रथम येत्या गुरुवारी जिल्हा पालकमंत्री किंवा संबंधित नेते आणि अधिकाऱ्यांना निमंत्रित करणे.

तुंबलेल्या बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे उद्भवलेली परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर करणे. तसेच मागणीची त्वरित दखल घेऊन कार्यवाही सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडणे असे निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आले.

बैठकीत आपले विचार व्यक्त करताना म. ए. समितीचे नेते प्रगतशील शेतकरी रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, यापूर्वीही शेतकऱ्यांवर अनेक वेळा अन्याय झाला आहे त्यावेळी आम्ही संघटितपणे त्या न्यायाला तोंड देऊन त्यावर मात करून आमची कामे करून घेत होतो मात्र अलीकडे सर्वजण विस्कळीत झाल्यामुळे शेतकरी बांधवांवर आज ही वेळ आली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही. यात भर म्हणून आपण आपापसातच वाद करून दुसऱ्यांचा फायदा करून देत आहोत. त्यामुळेच सरकार दरबारी शेतकऱ्यांची कामे होईनाशी झाली आहेत. तेंव्हा आता माझी सर्व नेतेमंडळी आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की यापूर्वी जे काही झालं ते विसरून सर्वांनी या क्षणापासून संघटितपणे आपल्या शेतजमिनी वाचविण्यासाठी कंबर कसली पाहिजे.Ballari nala

प्रश्न फक्त शेतकरी किंवा बळ्ळारी नाल्याचा नाही. गाळ केरकचरा तुंबून बळारी नाल्याला जो पूर आला आहे त्यामुळे उपनगरांमध्येही पाणी शिरले आहे. त्यामुळे बळ्ळारी नाला स्वच्छ झाला तर शेतीही वाचेल आणि उपनगरांमधील घराघरांमध्ये पाणी शिरणेही बंद होईल. यासाठी आपण काही प्रमुख मंडळी बसून व्यवस्थित कार्यक्रम आखून चांगले नियोजन करूया.

बळ्ळारी नाला विकासासंदर्भात पालकमंत्र्यांची भेट घेऊया. आपण सर्वजण शेतकरी आहोत शेतकऱ्याला जात-पात, धर्म, भाषा असा कोणताही भेदभाव नसतो. शेतकऱ्यांची जात ही शेती आणि भाषा देखील शेतीच असते. त्यामुळे आम्हाला काँग्रेस पक्ष जितका महत्त्वाचा आहे तितकाच भाजप पक्षही आहे.

आमचा राष्ट्रीय पक्षांची संबंध नसला तरी आता जे सरकार अधिकारावर आहे त्याच्याकडे दाद मागणे हे शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे. त्याकरता येत्या दोन दिवसात आपण सर्वांनी लोकप्रतिनिधी मंत्र्यांना येथे निमंत्रित करूया. ते स्वतः बळ्ळारी नाला परिसराची पाहणी करू देत. सर्व काही करूनही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाले तर मागणी मान्य करून घेण्याचे दुसरे मार्गही शेतकऱ्यांना माहीत आहेत. गरज पडल्यास आपण त्या मार्गांचाही अवलंब करूया. मागणीच्या पूर्ततेसाठी नेतेमंडळींप्रमाणे आपण सर्वांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे. हे सर्व करत असताना मी मोठा नेता की तू मोठा नेता अशी इर्षा कृपया कोणीही करू नये. एखाद्या शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर कोणाच्या फोनची किंवा इशाऱ्याची वाट न पाहता सर्वांनी घटनास्थळी हजर झाले पाहिजे. या पद्धतीने संघटित वृत्ती दाखवली तरच शेतकरी म्हणून आपण सर्वजण टिकणार आहोत. अन्यथा शेतजमिनी हडपण्यासाठी बसलेल्या गिधाडांच्या तावडीतून शेतकरी सुटणे अशक्य आहे असे मला वाटते. येत्या गुरुवारी पालकमंत्री किंवा जे कोणी नेते या ठिकाणी येतील त्यांच्यासमोर आपण आपल्या समस्या मांडूया. तसेच नाला सर्वेक्षणाचे काम अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊया.

सर्वेक्षणावेळी संबंधित शेतकरी आणि आपली कमिटी त्या ठिकाणी उपस्थित असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी कोणी नाल्यामध्ये अतिक्रमण केले आहे त्यांनी ते स्वतःहून हटवावे. अन्यथा प्रशासनाच्या मदतीने आम्हाला ते हटवावे लागेल असे सांगून येत्या गुरुवारी या ठिकाणी नेतेमंडळी जेव्हा येथील त्यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

त्याचप्रमाणे नाल्याच्या पुराचा फटका बसलेल्या मंगाईनगर वगैरे भागातील नागरिक त्यावेळी उपस्थित राहिले तर अधिकच उत्तम होणार आहे. कारण बळ्ळारी नाल्याची समस्या सुटून शेतकऱ्यांची जमीन सुरक्षित रहावी यासाठी शक्ती प्रदर्शन आवश्यक आहे. थोडक्यात आपण सर्वांनी संघटितपणे सरकार, प्रशासनाला बळ्ळारी नाल्याची समस्या सोडवण्यास भाग पाडूया, असे रमाकांत कोंडुसकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.