Tuesday, December 24, 2024

/

जेंव्हा कष्टाला यशाचे भाले फुटतात…

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मेहनत घेतली की यश नक्की मिळते, हे बेळगुंदी गावातील युवक जीवन रामलिंग शहापूरकर याने देशातील स्पर्धात्मक कठीण परीक्षांपैकी एक असलेली यंदाची चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण होऊन सिद्ध केले आहे.

बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी सारख्या छोट्या गावातून प्राथमिक माध्यमिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या जीवनू शहापूरकर या सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील तरुणाने खडतर परिस्थितीवर मात करून पार्ट टाइम व्यवसाय करण्याबरोबरच अभ्यास करत चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत उज्वल यश मिळविले आहे हे विशेष होय.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर आय पाटील यांनी जीवन याचं अभिनंदन केलं त्यावेळी आपल्या या यशासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना जीवनू शहापूरकर म्हणाला की, माझं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील बेळगुंदी हायस्कूल या सरकारी मराठी शाळेमध्ये झाले आहे. माझे वडील शेतकरी होते, ज्यांचे 2010 मध्ये मी पदवी पूर्व प्रथम वर्षात असताना निधन झाले. त्यावेळी आमची घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. मला तीन भाऊ आहेत. आम्ही चौघेही हुशार असल्यामुळे शेती कोणाकडे सोपवायची? हा मोठा प्रश्न होता. तथापि शेती विकायला लागली तरी चालेल पण आपल्या सर्व मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. तशा परिस्थितीत मराठा मंडळ कॉलेजमधून मी अकरावी व बारावीसह बीकॉम पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या कालावधीत आम्हा सर्व कुटुंबीयांना हलाखीच्या खडतर परिस्थितीतून जावे लागत होते.

माझ्या एका भावाला बारावीच्या शिक्षणासाठी फी भरण्याकरिता पैसे नव्हते. त्यानंतर एक वर्ष वाया जाऊनही त्याने बारावीचे शिक्षण मेहनतीने पूर्ण केले. घरची परिस्थिती कठीण असल्यामुळे शैक्षणिक सुट्टीच्या काळात मी व माझ्या भावांनी गवंडी काम, भाजीपाला विकणे वगैरे मिळेल ती कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याबरोबरच आमचे शिक्षणही पूर्ण केले. माझ्या अन्य एका भावाने तर वाणिज्य शाखेत बारावीला मराठा मंडळ कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. वडील वारल्यानंतर माझा एक भाऊ भारतीय नौसेनेत दाखल झाल्यामुळे आमची घरची परिस्थिती थोडी सुधारली. तथापी थोडक्यात सांगायचे तर चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेतील यश हे मी खडतर मेहनतीसह संघर्ष करत मिळविले आहे.Belgundi ca

चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा देऊन त्यात यश मिळवू इच्छिणाऱ्यांना संदेश देताना जीवनू याने सांगितले की, बीकॉम झाल्यानंतर मी पुण्याला एक कोर्स केला. त्यावेळी मी व माझा एक मित्र 12 ते 14 तास सतत अभ्यास करत होतो. गेल्या 2019 ला मी चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घेतलं. या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क वगैरे जास्त लागत नसले तरी मेहनत खूप करावी लागते.

दररोज किमान 10 ते 12 तास सतत अभ्यास केला तरच परीक्षेत उत्तीर्ण होण्याची शक्यता असते. माझ्या गावातही अनेक हुशार मुले आहेत, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन लाभत नाही. मला देखील वेळेवर मार्गदर्शन न लाभल्यामुळे आज मला मिळालेले यश हे थोडं उशिराच मिळाले आहे.

चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेसाठी कोणताही आरक्षण वगैरे नसतं इथे जेवढी मेहनत कराल तेवढे चांगले यश मिळते. त्यामुळे जिद्द चिकाटी व मेहनत घेण्याची तयारी असेल तर ग्रामीण भागातील हुशार युवक चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत सहज यश मिळवू शकतात, असे जीवनू शहापूरकर यांनी शेवटी स्पष्ट केले. यापूर्वी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणारे आकाश चौगुले हे बेळगुंदी गावचे होते. आता त्यांच्यानंतर जीवनू शहापूरकर हा पहिला युवक आहे ज्याने चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत सुयश मिळवून बेळगुंदी गावाचे नाव उज्वल केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.