बेळगाव लाईव्ह : स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निष्क्रियता तसेच बाहेरील उमेदवार असूनही मराठी भाषिकांनी जगदीश शेट्टर यांना दिलेला पाठिंबा, प्रामुख्याने या दोन गोष्टी गेल्या बेळगाव लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत असल्याचे परखड मत माजी आमदार रमेश कुडची यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघात फक्त मराठी भाषिकांमुळेच भाजपच्या जगदीश शेट्टर यांचे वर्चस्व राहिले असे माझे स्पष्ट मत आहे. त्यामुळे पंचमसाली समाज आपल्याला मदत करेल हा वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचा अंदाज चुकीचा ठरला असे माजी आमदार कुडची यांनी सांगितले. मी सुद्धा एकेकाळी विधानसभेत होतो.
संभाजी पाटील आणि अरविंद पाटील देखील होते. या पाटील व्दयींनी त्यावेळी विधानसभेच्या सभागृहात मराठी भाषेत बोलण्यास सुरुवात केल्यानंतर या जगदीश शेट्टर यांनीच त्यांना ‘तुम्ही मराठीत बोलणार असाल तर महाराष्ट्रात जा’ असा मानहानीकारक सल्ला दिला होता. अशा या मराठी व्देष्ट्या शेट्टर यांना आपल्या मराठी भाषिकांनी मत दिली ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, असे त्यांनी खेदानी सांगितले.
आज बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव शहरात एकेकाळी काँग्रेसच्या तिकिटावर मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर अलीकडे विधानसभा निवडणुकीत राजू शेठ यांना 60000 आणि लोकसभा निवडणुकीत मृणाल हेब्बाळकर यांना 81000 मते मिळाली. ही मते कुठून मिळाली? याचा विचार करणे गरजेचे आहे. इतकी मते पडण्यासाठी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी खरंच कार्य केलं असेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेसला विजय मिळवून देताना बेळगाव उत्तर आणि दक्षिणचे कार्यकर्ते कुठे होते? बेळगाव दक्षिणबद्दल बोलायचे झाल्यास त्या ठिकाणी पूर्वी लोकसभेसाठी निवडणूक लढविलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांना फक्त 35000 मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर सतीश जारकीहोळी यांनी त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना 27 हजार मते पडली. यावेळी त्या ठिकाणी भाजप उमेदवाराला 47 हजार मते मिळाली. याला काँग्रेसचे तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची निष्क्रियता कारणीभूत आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्ता आणि माजी आमदार या नात्याने मी सर्व ठिकाणी दौरा केल्यानंतर त्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, निरीक्षक यापैकी कोणीही मला दिसलं नाही. त्यामुळेच बेळगाव उत्तर मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त मते मिळवली आहेत, असे कुडची यांनी स्पष्ट केले.
गेल्या 2013 मध्ये यूपीए सरकार असताना एक कायदा संमत झाला होता. त्या कायद्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करायचे असल्यास त्याला स्थानिक 80 टक्के लोकांची मान्यता असायला हवी. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला आजच्या बाजारभावाप्रमाणे त्या जमिनीची किंमत अदा केली गेली पाहिजे.
मात्र सदर कायदा 2014 मध्ये देशात मोदींचे भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर रद्द करण्यात आला. त्यामुळेच आज बेळगावचा रिंग रोड, हलगा -मच्छे बायपास वगैरेंच्या बाबतीत मराठी भाषिक शेतकऱ्यांना झगडावे लागत आहे. बेळगावचे खासदार म्हणून चार वेळा निवडून आलेल्या सुरेश अंगडी यानी त्यांच्या 20 वर्षाच्या कार्यकाळात मराठी भाषिकांचा एकही प्रश्न सोडवला नाही. हा वीस वर्षाचा अनुभव गाठीशी असतानाही पुन्हा भाजपला मतदान करणं कितपत योग्य आहे? कोणत्या आधारावर हे मतदान केलं गेलं? हिंदू धर्म लयाला जाणारा नाही आणि देशातील जे सर्व हिंदू आहेत ते सर्व भाजपचेच आहेत असे नाही तसेच सर्व हिंदू रामभक्त आहेत आणि हे भाजपने आम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे मराठी भाषिकांनी जर धर्माच्या नावाखाली किंवा हिंदू धर्माच्या नावाखाली भाजपला आपलं मानलं असेल तर ते त्यांचे दुर्दैव आहे.
रिंग रोड, बायपाससाठी ताब्यात घेतल्या जाणाऱ्या आपल्या शेतजमिनी वाचवण्यासाठी मराठी भाषिक शेतकरी झगडत आहेत. मात्र आजपर्यंत कोणताही भाजप नेता त्यांच्याकडे फिरकलेला नाही. मला एकच सांगायचे आहे. राजकारण आणि लोकांचे प्रश्न या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्मार्ट सिटी योजनेचा गवगवा केला जातो. परंतु एकेकाळी मी जेंव्हा बेळगावचा महापौर होतो, तेंव्हा पाण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज पाईपलाईन यांच्या नूतनीकरणाला प्राधान्य दिले होते. त्यावेळी बेळगाव शहराची व्याप्ती 35.7 कि.मी. इतकी होती जी आज 97.7 कि.मी. इतकी झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सध्याच्या घडीला ज्या 35.7 कि.मी. व्याप्तीमध्ये ड्रेनेज लाईन आहे तिचे प्रथम नूतनीकरण करण्याऐवजी लांब कुठेतरी गटारी, पेव्हर्स रस्ते, फुटपाथ वगैरे यांची निर्मिती केली जात आहे. फक्त या गोष्टींमुळे आपले बेळगाव स्मार्ट होणार आहे का? असा सवालही शेवटी माजी आमदार रमेश कुडची यांनी केला.