बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील गोकाक फॉल्स धबधबा संपूर्णपणे प्रवाहित झाल्यामुळे या धबधब्याजवळ जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अतिउत्साही पर्यटक रोरावत कोसळणाऱ्या गोकाकच्या धबधब्याजवळ धोकादायकरित्या पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांसंदर्भात बेळगाव लाईव्हने काल सोमवारी ‘गोकाक फॉल्स येथे अतिउत्साही पर्यटनाला लगाम आवश्यक’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. प्रत्यक्ष व्हिडिओसह प्रसिद्ध झालेल्या या बातमीची दखल घेत आता जिल्हा पोलीस प्रमुखांनी एका आदेशाद्वारे गोकाकच्या धबधब्या नजीक जाण्यास प्रवेश बंदी केली आहे.
गेल्या कांही दिवसांपासून आंबोलीसह पश्चिम घाटमाथ्यावर होणाऱ्या संततधार पावसामुळे घटप्रभा नदीला पूर येऊन बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा संपूर्ण प्रवाहित झाला आहे. त्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून हा प्रवेश बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील सात धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश वनविभाग विभागाकडून नुकताच जारी करण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात पश्चिम घाटात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व नद्या व धबधब्यांची पातळी वाढली आहे. याची दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील चिखले धबधबा, बटावडे धबधबा, पारवाड धबधबा, चोर्ला धबधबा, वज्रपोहा धबधबा व अन्य दोन धबधब्यांच्या परिसरात जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
वनविभागाकडून याबाबत आदेश जारी करताना सुरक्षिततेचा उपाय म्हणून निर्णय घेतल्याचे कळविले आहे. निर्बंध जारी परिक्षेत्रात जाण्यापासून रोखण्यासाठी वन विभागातर्फे गस्त घातली जात आहे.
गोकाक फॉल्स येथे अतिउत्साही पर्यटनाला लगाम आवश्यक