बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे यंदा देखील या पावसाळ्यात बेळगावच्या स्मार्ट सिटी योजनेची काळी बाजू समोर येत आहे. गटारी व ड्रेनेजचे उदाहरण द्यायचे झाल्यास देखभालीचा अभाव असलेल्या अवैज्ञानिक गटार व ड्रेनेज बांधकामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना नाहक सहन करावा लागत आहे. सध्याच्या पावसामुळे महाद्वार रोड क्रॉस नं. 5 येथे ड्रेनेजचे गलिच्छ पाणी रस्त्यावर येऊन नरक समान अस्वच्छता निर्माण झाल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.
बेळगाव महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडकडून शहरातील बहुतांश भागांमध्ये गटारी व ड्रेनेजचे बांधकाम अवैज्ञानिक पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या एक-दोन आणि सध्याच्या पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी तुंबणाऱ्या गटारी व ड्रेनेज पाहता या आरोपात तथ्य असल्याचे सिद्ध होत आहे. यात भर म्हणून महापालिकेकडून वेळच्यावेळी गटारी व ड्रेनेजच्या साफसफाई कडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या महाद्वार रोड क्रॉस नं. 5 येथील ड्रेनेज तुंबून मोठ्या प्रमाणात घाण, केरकचरा मिश्रित सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. या रस्त्याच्या प्रवेशाच्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे पाणी साचून अस्वच्छतेसह दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.
पावसाळ्यातील संभाव्य रोगराईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कालच आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबरोबरच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना महापालिकेसह ग्रामपंचायतींना दिला आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. ही वस्तुस्थिती असताना स्मार्ट बेळगावमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी वरील प्रमाणे ड्रेनेज व गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे. महाद्वार रोड क्रॉस नं. 5 येथे रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे सध्या स्थानिक रहिवाशांना त्रास -मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सदर रहिवाशांनी आज मंगळवारी सकाळी बेळगाव लाईव्हसमोर आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हे फक्त यावर्षी घडले नाही तर दरवर्षी पावसाळ्यात येथील ड्रेनेज व गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. रस्त्यावर साचणाऱ्या या गलिच्छ पाण्यामुळे पायी चालत जाणारे नागरिक विशेष करून शाळकरी मुलांची कुचुंबना -गैरसोय होत आहे.
पावसाळ्यामध्येच नव्हे तर उन्हाळ्यामध्ये देखील हा प्रकार घडतो. तुंबणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला असून त्यामुळे आमच्या व आमच्या मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत आमच्या या भागातील तिघा जणांना डेंग्यू झाला आहे.
अस्वच्छतेमुळे लोक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती देऊन या संदर्भात स्थानिक नगरसेवकांकडे वेळोवेळी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याची तक्रार महाद्वार रोड क्रॉस नं. 5 येथील रहिवाशांनी केली. तसेच महापौरांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या भागातील तुंबणाऱ्या गटारी व ड्रेनेजची युद्धपातळीवर साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. आता महापालिका या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते? हे पहावे लागेल.