बेळगाव लाईव्ह : दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात असल्याचा आरोप करत विवाहितेने विष प्रश्न करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या गणेशपूर भागातील कन्विका गणेश गुड्याळकर (वय, २०) असे या विवाहितेचे नाव असून तिच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, १८ ऑक्टोबर २०२२ रोजी कन्विकाचा विवाह गणेशपूर येथील गणेश गुड्याळकर नामक तरुणाशी झाला होता. आपण अभियांत्रिकी पदवीधर असल्याचे सांगून सदर तरुणाने तरुणीशी विवाह केला होता.
विवाहादरम्यान सदर तरुणीला तिच्या कुटुंबीयांनी सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, हार, कर्णफुले, अंगठ्या असे १३ तोळे दागिने दिले होते. मात्र विवाहाच्या काही दिवसातच हुंड्यासाठी पुन्हा तरुणीचा शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप तरुणींसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आपण अभियांत्रिकी पदवीधर असल्यामुळे आपण खूप पैसे कमवू असा विश्वास गणेशला होता. मात्र त्याचा हा विश्वास फारकाळ टिकला नाही. विवाहानंतर सासू, सासरे, दीर यांच्याकडून आपला शारीरिक छळ करण्यात आला. दरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलीच्या प्रेमाखातर ७ लाख रुपये पुरविले.
मात्र तरीही सासरच्या मंडळींकडून मागण्या काही संपल्या नाहीत. याबाबत पोलीस स्थानकात तक्रार करूनही दुर्लक्ष करण्यात आले. आपल्याला न्याय मिळाला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. दररोजच्या या जाचाला कंटाळून अखेर विवाहितेने आत्महत्येचे पाऊल उचलले असून तिच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.