बेळगाव लाईव्ह : पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी सर्दी, तापाची लक्षणे अनेक नागरिकांमध्ये दिसून येत असून अशी लक्षणे दिसून आल्यास याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घेण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी केले आहे.
आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कि जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डेंग्यूसह चिकुनगुनिया, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार वाढत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.
तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखावी, ताप आणि सर्दीची लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, उपचारासाठी शासकीय रुग्णालयावर अधिक भर द्यावा, असे ते म्हणाले.
डेंग्यूबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून डेंग्यूची बाधा झाल्यानंतर वेळेत उपचार घेतल्यास डेंग्यू पूर्णपणे बरा होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.