बेळगाव लाईव्ह : गेल्या आठवड्याभरापासून शहर आणि तालुका परिसरात सध्या पावसाचे थैमान सुरू आहे. त्याचबरोबर डेंग्यू सारख्या विकारांनी देखील हाहाकार माजवलेला आहे.
अनेक ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून होनगा येथील एका शालेय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
यापूर्वी देखील बेळगाव तालुक्यात डेंग्यूचे दोन बळी गेले आहेत. आता होनगा येथील एका शालेय विद्यार्थिनीचा डेंग्यूमुळे संशयास्पद रित्या बळी गेल्याचेही बोलले जात असून या प्रकरणामुळे आरोग्य खात्याच्या तत्परतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील प्रणाली परशुराम हुंदरे या १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून सदर मुलीला डेंग्यूची लागण झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या मुलीला रविवारी दोन वेळा उलट्या झाल्या आणि सोमवारी तिला ताप आला. प्रणालीच्या कुटुंबीयांनी तीला मंगळवारीच जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र उपचाराचा उपयोग झाला नसल्याने त्या मुलीचा शनिवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर आरोप केल्याचीही माहिती उपलब्ध झाली असून प्रणालीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयासमोर व्यक्त केलेल्या आक्रोशाने हृदय पिळवटून टाकले. या घटनेमुळे होनगा गावावर शोककळा पसरली आहे