बेळगाव लाईव्ह : संततधार पावसाने जिल्ह्यात पुन्हा साथीचे थैमान सुरू केले असून, जिल्ह्यात डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले आहेत. यासोबतच चिकन गुनिया, मलेरियासारखे आजार देखील बळावत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाची धडपड सुरू आहे.
या महिन्यात बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून कळते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. बेळगाव तालुक्यात एका तरुणाचा आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र हे मृत्यू डेंग्युमुळेच झाले आहेत का हे अद्याप स्पष्ट नाही.
जनतेमध्ये ताप, डोकेदुखी, थकवा, डोळे दुखणे, डोळ्यांच्या मागे दुखणे, भूक न लागणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, पुरळ आणि प्लेटलेटसची संख्या कमी होणे अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरोग्य विभागासमोर डेंग्यूचा फैलाव मोठे आव्हान बनले असून यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन या साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात १२३७ जणांनी तपासणी केली होती यापैकी १०१ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. तर यावर्षी १४९० जणांनी तपासणी केली असून यापैकी १७१ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे.
जून – जुलै महिन्यातच डेंग्यू हा आजार डोके वर काढतो. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, डेंग्यूसदृश्य लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी केले आहे.
राज्याच्या राजधानीत डेंग्यू रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते असून इतर जिल्ह्यातही डेंग्यू आपले प्रस्थ वाढवू पाहतो आहे. संपूर्ण राज्यात साडेपाच हजारहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रोगराईच्या नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपचारासाठी आवश्यक औषध साठा प्लेटलेट्स तयार ठेवण्याची सूचना केली आहे. डेंग्यू निवारण्यासाठी आरोग्य यंत्रणेची मात्र आगामी काळात कसरत असणार आहे. मागील महिन्यात बीबीएमपीचे मुख्य आयुक्त तुषार गिरीनाथ हे स्वत: डेंग्यूने त्रस्त होते. त्यामुळे राजधानीतील परिस्थिती काय आहे, हे लक्षात येते.
बेळगाव शहर व जिल्ह्यातही डेंग्यू रुग्ण वाढत आहेत. सरकारी इस्पितळात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढती आहे. यासंबंधी सरकारी यंत्रणेकडून जितक्या प्रमाणात जनजागृती व्हायला हवी होती, तेवढी होताना दिसत नसून वाढत्या डेंग्यू रुग्णांची संख्या पाहता आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज आहे.