बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कांही प्रमुख रस्त्यावर अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे पडले आहेत ते ताबडतोब बुजवून रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी बेळगाव व्यापारी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
बेळगाव व्यापारी आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल (एफएफसी) यांच्या शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी मनपा आयुक्तांना सादर केले. आयुक्तांच्या गैरहजेरीत उपायुक्तांनी निवेदनाचा स्वीकार करून सकारात्मक प्रतिसाद देत त्वरेने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदनात रविवार पेठ, केळकर बाग, नरगुंदकर भावे चौक, देशपांडे पेट्रोल पंपाशेजारी फुलबाग गल्ली, दुसरे क्रॉस भाग्यनगर प्रवेशद्वार, उद्यमबागकडे जाताना फ्लायओव्हरच्या खाली असलेला तिसरे रेल्वेगेट येथील रस्ता इत्यादी खड्डे पडून वाताहत झालेल्या रस्त्यांची यादी देण्यात आली आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर फक्त आश्वासन देऊन न थांबता मनपा उपायुक्तांनी व्यापारी व एफएफसीच्या शिष्टमंडळासोबत सोबत पालिकेचे पथक सर्वेक्षणासाठी पाठवले. या पथकाला शिष्टमंडळातील सदस्यांनी संबंधित रस्त्यांवरील खड्डे असलेल्या जागा दाखविल्या.
सर्वेक्षणाअंती मनपा पथकाने दिलेल्या माहितीनुसार सध्या खड्डे बुजवण्यासाठी खडी टाकण्याची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाऊस थांबला की तेथे पेव्हर टाकले जातील किंवा रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल. उपरोक्त निवेदन सादर करतेवेळी पद्मप्रसाद हुली, अवधूत तुडवेकर आणि संतोष दरेकर उपस्थित होते.