बेळगाव लाईव्ह :गोकाक येथील सरकारी पदवीपूर्व कॉलेजमध्ये निर्मित काळजी केंद्रात स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्त कुटुंबीयांची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज रविवारी सकाळी भेट घेऊन विचारपूस केली. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
सध्या जिल्हाभरात पडणारा पाऊस आणि कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा यासह सर्व नद्यांची वाढत असलेली पाणी पातळी यामुळे नदीपात्राजवळील अनेक गावे जलमय होणार आहेत. त्यासाठी खबरदारी म्हणून गोकाक, अथणी, कागवाड, चिक्कोडी, मुदलगी आणि निप्पाणी तालुक्यातील नदीकाठच्या ग्रामस्थांना काळजी केंद्रात हलवण्यात आले आहे. गोकाक शहरातील सरकारी पदवी पूर्व कॉलेजमधील काळजी केंद्राला दिलेल्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांनी तेथील जेवण व इतर पायाभूत सुविधांची पाहणी केली.
काळजी केंद्रामध्ये आश्रय घेतलेल्या पीडितांशी संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणाले की, पूरग्रस्तांनी कोणत्याही कारणाने घाबरून जाऊ नये. सरकार त्यांना सर्व प्रकारची मदत करत आहे. काळजी केंद्रात प्रत्येकाला उत्तम दर्जाचे जेवण दिले जात आहे.
अत्यावश्यक वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जात आहेत. नदीकाठचे काही गावकरी काळजी केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यास नकार देत आहेत. प्रत्येकाचे जीवन मौल्यवान असल्याने त्यांनी तसे न करता खबरदारीचा उपाय म्हणून काळजी केंद्रे किंवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे अशी त्यांनी विनंती केली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काळजी केंद्रामध्ये आश्रय घेतलेल्या एका गर्भवती महिलेबद्दल माहिती देऊन तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याची सूचना आपण केल्याचे सांगितले. काळजी केंद्रात आश्रयास असलेल्या लोकांना वेळेवर जेवण व इतर सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी तहसीलदारांना केल्या. याशिवाय, प्रत्येक तालुक्याला नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी दररोज त्यांच्या काळजी केंद्रांना भेट देऊन पीडितांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
गोकाक येथील आश्रय केंद्राला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गोदाचिनमल्की धबधबा परिसराची पाहणी केली तसेच उपस्थित पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्याचा प्रवाह वाढल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. यावेळी गोकाक तहसीलदार मोहन भस्मे, नोडल अधिकारी बसवराज कुरी वाघ आदी उपस्थित होते.
मदत वाहिनीवर (हेल्पलाइन) संपर्क साधण्याची विनंती : दरम्यान, नदीकाठच्या ग्रामस्थांना पुरामुळे कोणत्याही प्रकारची अडचण किंवा धोका निर्माण झाल्यास तातडीने मदत वाहिनी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. पूर हेल्पलाइन क्रमांक -0831-2407290, पोलीस हेल्पलाइन -0831-2474054, आपत्कालीन मदतीसाठी -112.