बेळगाव लाईव्ह : पावसाळा सुरु झाल्यानंतर दरवर्षी बळ्ळारी नाला परिसरातील शेतजमिनींना फटका बसतो. बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. बळ्ळारी नाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यावर तोडगा काढण्यासाठी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आज शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनाचा स्वीकार करून बळ्ळारी नाला परिसराची पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी, बळ्ळारी नाल्यासंदर्भातील समस्या, एमएसपी दर यासह विविध मागण्यांच्या आग्रहास्तव आज बेळगावमधील शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने यावेळी करण्यात आली.
दरवर्षी बळ्ळारी नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची तसेच पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी स्पॉट इन्स्पेक्शन करून कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले. या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील शेतकरी नेते आणि बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या बहुतांश मुख्य लोकांशी भेटून संवाद साधत आहेत. सोमवारी देखील शेतकऱ्यांनी जे आंदोलन केल्या त्या आंदोलनाला जिल्हाधिकारी सामोरे गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू असते वेळी अचानक पाऊस सुरू झाला त्यावेळी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करायला गेले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना छत्री देऊ केली मात्र शेतकरी भिजत असलेले पाहून जिल्हाधिकाऱ्यांना देखील छत्री घेण्यास नकार करत भिजत शेतकऱ्यांची चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे उपस्थित पत्रकार आणि शेतकऱ्यांमध्ये कौतुक होत होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेली ही माणुसकी कौतुकास्पद आहे अशीच चर्चा यावेळी ऐकायला मिळाली.