बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे. उपनगरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले असून अनेक भागातील घरातून पाणी शिरले आहे त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
बेळगाव शहरातील दक्षिण भागातील विशेषता अन्नपूर्णेश्वरी नगर येळळूर रोड, विष्णू गल्ली निजामिया नगर धामणे रोड या सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधा उडाली आहे.
पावसात समस्या निर्माण होवू नये, यासाठी महापालिका सतर्क आहे. महापालिकेने विविध पथके तयार केली असून 24 तास तयारी सजग आहेत. पावसाचा जोर वाढला असल्यामुळे काही भागात पाणी शिरत आहे. त्यामुळे तेथील लोकांना निवारा केंद्रांत दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी दिली.आयुक्त दुडगुंटी यांनी आज सकाळी बळ्ळारी नाला, वडगाव परिसर, निवारा केंद्र आदी ठिकाणी पाहणी करून अधिकार्यांना विविध सूचना केल्या.
यावेळी ते म्हणाले, महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई केली आहे. त्यामुळे बळ्ळारी नाला परिसरात पूरस्थिती असली तरी त्याचा शहराला आतापर्यंत धोका नाही. सध्या वडगाव परिसरातील साई कॉलनी, केशव नगरातील काही भागात पाणी शिरले आहे. त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
शहरात लोकांच्या स्थलांतरासाठी दहा ठिकाणी निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्याठिकाणी 24 तास सतर्क असलेल्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बळ्ळारी नाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पण, तहसीलदारांच्या पंचनाम्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध निवारा केंद्रांना भेटी देवून अधिकार्यांना सूचना केल्या. यावेळी स्थानिक नगरसेवक महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.