बेळगाव लाईव्ह :जीएसटी लागू करून कर प्रशासनातील ऐतिहासिक बदलाच्या यशामध्ये उद्योग आणि कर प्रशासनाची भूमिका प्रशंसनीय असून गेल्या 7 वर्षांतील हे उत्कृष्ट आणि अखंड यश आहे, असे प्रतिपादन सेंट्रल जीएसटी बेळगावचे मुख्य आयुक्त दिनेश राव पंगारकर यांनी केले.
देशाच्या प्रशासनामध्ये वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) यशस्वी अंमलबजावणीला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय कर कार्यालय, बेळगाव एक्झिक्युटिव्ह, ऑडिट आणि अपील आयुक्तालय यांच्यातर्फे केएलई सेंटीनरी कन्व्हेन्शन हॉल येथे आयोजित विशेष समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनियर लीडर्स विंग इन्फंट्री स्कूल बेळगावचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुराया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात कर सुधारणांचे स्वागत करून सशस्त्र सेना नागरिकांना सुरक्षा आणि स्वातंत्र्य प्रदान करत असताना कर विभाग देशाला आर्थिक सुरक्षा प्रदान करत आहे आणि दोघेही राष्ट्राच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी प्रयत्नशील आहेत, असे विचार व्यक्त केले.
डीजीजीआय बेळगावचे अतिरिक्त महासंचालक आरोकिया राज आणि आयुक्त (अपील्स) अमरजीत सिंग यांनी देखील यावेळी समायोजित विचार व्यक्त केले.
सदर समारंभात जीएसटीच्या यशासाठी अपवादात्मक सेवा आणि योगदान देणाऱ्या सेंट्रल जीएसटीच्या 12 अधिकाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांसह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव किथ मचाडो आणि आयसीएआय बेळगाव शाखेचे व्हा. चेअरमन विराण्णा मुरगोड यांनी कर सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी विभागाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि 53 व्या परिषदेच्या बैठकीत जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे स्वागत केले.
समारंभास निमंत्रितांसह केंद्रीय कर कार्यालय, बेळगाव एक्झिक्युटिव्ह, ऑडिट आणि अपील आयुक्तालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.