बेळगाव लाईव्ह :कॅन्टोन्मेंट हद्दीतील कॅम्प हायस्ट्रीट या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज रोड’ असे नामकरण करण्याबरोबरच इतर रस्त्यांना देशासाठी शहीद झालेल्या डॉ विक्रम बत्रा, संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह अन्य सैनिकांची नावे देण्यात आली आहेत.
या पद्धतीने कॅन्टोन्मेंट व्याप्तीतील ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत घेण्यात आला आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्त्यांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याबरोबरच आतापर्यंत ‘कॅन्टोन्मेंट बोर्ड बेलगाम’ असा जो उल्लेख केला जात होता.
त्यामध्ये बेलगाम ऐवजी ‘बेळगावी’ असा बदल करून बोर्डाचे नामांतरण ‘कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावी’ असे करण्याला मंजुरी देण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामांतरण बेळगावी असे करण्यासाठी बोर्डाकडून आक्षेप मागविण्यात आले होते याला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आक्षेप नोंदवला होता तथापि बैठकीत यासंदर्भात बोलताना बोर्डाचे सीईओ राजीव कुमार यांनी बेळगावी नामांतरणासंबंधी एक आक्षेप आलेला असून त्यामध्ये सीमाप्रश्नाची माहिती देण्यात आली आहे.
मात्र यापूर्वीच बेळगावचे नामांतरण बेळगावी झाले आहे. आता फक्त कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बेळगावी करण्यासाठी ही प्रक्रिया आहे अशी माहिती दिली. तेंव्हा यावर कोणतीही सविस्तर चर्चा न होता ब्रिगेडियर मुखर्जी यांनी नामांतरणास मंजुरी असल्याचे जाहीर केले.
सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णंयानुसार महसूल वाढण्यासाठी किल्ला येथील जुने भाजी मार्केट मधील गाळे पाडले जाणार असून त्या ठिकाणी पार्किंगची सोय केली जाणार आहे. याबरोबरच किल्ल्यातील कमलबस्ती परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
फिश मार्केट, रामकृष्ण मिशन, वनिता विद्यालय परिसरासह अन्य तीन जागा भाडेतत्त्वावर दिल्या जाणार आहेत. सीपीएड मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रतिदिन 1000 रुपये भाडे आणि 500 रुपये स्वच्छता कर भरावे लागणार आहे. काल झालेल्या या बैठकीस अध्यक्ष ब्रिगेडियर मुखर्जी, सीईओ राजीवकुमार, नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.