बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील डॉ भीमराव आंबेडकर उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कित्तूर चन्नम्मा सर्कल जवळ आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या स्मार्ट बस थांब्यांचे कोसळण्याच्या स्थितीत असलेले धोकादायक छत ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.
शहरातील डॉ. भीमराव आंबेडकर उद्यानाकडे जाताना न्यू बिम्स हॉस्पिटल इमारती शेजारी राणी कित्तूर चन्नमा सर्कलजवळ असलेल्या बस थांब्याचे छत मोडकळीस आले आहे.
त्याचप्रमाणे आरटीओ सर्कलकडे जाताना जिल्हाधिकारी कार्यालय आवाराच्या अगदी समोरील आणखी एका बस थांब्याची देखील अशीच अवस्था आहे.
वरील दोन्ही बस थांब्याचे छत कधीही पडू शकेल अशा अतिशय धोकादायक स्थितीत आहे. सदर बस थांब्यांवर प्रवाशांची नेहमी गर्दी असते. विशेष करून सध्याच्या पावसाच्या दिवसात चन्नम्मा सर्कल येथील संबंधित बस थांब्याच्या ठिकाणी शाळा व कॉलेजेसचे विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आश्रयाला थांबलेले असतात.
हे ध्यानात घेऊन एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी सदर बस थांब्याचे छत युद्धपातळीवर व्यवस्थित दुरुस्त केले जावे अथवा दुरुस्ती होईपर्यंत खबरदारी म्हणून हे बस थांबे सार्वजनिकांसाठी तात्पुरते बंद ठेवावेत, अशी मागणी एफएफसीचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केली आहे.