बेळगाव लाईव्ह :राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकी होळी यांनी उद्या शुक्रवारी सकाळी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे केडीपी अर्थात कर्नाटक विकास कार्यक्रमाची बैठक बोलावली आहे.
सदर बैठकीत बेळगाव जिल्ह्यातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातील समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे त्याचप्रमाणे सार्वजनिकांच्या समस्या संदर्भात अधिकाऱ्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. जिल्ह्यात उद्भवलेल्या डेंग्यूच्या संसर्गाला आळा घालण्या संदर्भात आरोग्य खात्याने कोणते क्रम हाती घेतले आहेत यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.
त्याचप्रमाणे पाईपलाईन घालण्याच्या कामाद्वारे बेळगाव शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेला जबाबदार असणाऱ्या एल अँड टी कंपनी विरुद्ध बैठकीत टीका होण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा असून यावर्षी या जिल्ह्यामध्ये दोन महत्त्वाचे उत्सव साजरे केले जाणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये बेळगावमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते त्याला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. हा शतक महोत्सव मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यासंदर्भात उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
यावर्षी बेळगाव जिल्हा आणखी एका महत्त्वाच्या उत्सवाचा साक्षीदार बनणार आहे. ब्रिटिशांना नामोहरम करणाऱ्या वीर राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवाला यंदा 200 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यामुळे यावर्षीचा हा उत्सव राष्ट्रीय उत्सव झाला पाहिजे असे सर्वांचे मत असल्यामुळे त्या अनुषंगाने रूपरेषा ठरवण्याबद्दल उद्याच्या केडीपी बैठकीत चर्चा होणार असल्याचे कळते.