बेळगाव लाईव्ह :श्रीलंका येथे आयोजित दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील थ्रो बॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी बेळगावचे 7 पॅरा खेळाडू आज सकाळी 10 वाजता अजमेर एक्सप्रेस रेल्वेने बंगलोरला रवाना झाले असून तेथून ते श्रीलंकेला जाणार आहेत. या खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी फेसबुक फ्रेंड सर्कल टीम आणि सुरेश यादव फाउंडेशनने विशेष परिश्रम घेतले.
बेंगलोर मार्गे श्रीलंकेकडे रवाना होणाऱ्या भारतीय थ्रो बॉल संघातील बेळगावच्या खेळाडूंची नावे सूरज धामणेकर, महांतेश होंगल, मन्सूर मुल्ला, सुरेश कुंभार, इरन्ना होंडप्पाण्णा, मनीषा पाटील व भाग्य मलाली अशी आहेत. या खेळाडूंनी प्रचंड समर्पण आणि चिकाटी दाखवली आहे आणि या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी त्यांची निवड त्यांच्या कौशल्य आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. सदर 7 क्रीडापटूंनी गेली नऊ वर्षे थ्रो बॉल या खेळात प्रभुत्व मिळविण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे.
थ्रो बाॅलमध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आणि उल्लेखनीय प्रतिभा असलेल्या या क्रीडापटूंसाठी श्रीलंकेत उद्या 23 जुलै ते 26 जुलै 2024 या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठीचा प्रवास व इतर आर्थिक खर्च आवाक्या बाहेरचा होता. आर्थिक पाठबळाशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण श्रीलंका येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक खेळाडूचा अंदाजे खर्च सुमारे रु. 65,000 आहे. ज्यामध्ये प्रवास, निवास आणि इतर आवश्यक खर्च समाविष्ट आहेत. दुर्दैवाने, त्यांनी खूप मेहनत करूनही त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही.
यासाठीच फेसबुक फ्रेंड्स सर्कलने दानशूर व्यक्ती, संस्था आणि समाजाला या खेळाडूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेकांनी मदतीचा हात दिल्यामुळे हे सातही खेळाडू आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या देशाचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणार आहेत.
सदर खेळाडू आज सकाळी अजमेर एक्सप्रेसने बेंगलोरला रवाना झाले. यावेळी बेळगाव रेल्वेस्थानकावर त्यांना निरोप देण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, ऑपरेशन मदत संघप्रमुख पद्मप्रसाद हुली, अवधूत तुडवेकर , गौतम श्रॉफ, प्रशिक्षक व्ही. एस. पाटील, सुरेश यादव फाउंडेशनचे संस्थापक सुरेश यादव आदींसह बरेच हितचिंतक उपस्थित होते.