बेळगाव लाईव्ह: गेल्या दोन वर्षात सर्वाधिक व्यस्त विमानतळाच्या सर्वोच्च यादीत समाविष्ट असणारे बेळगावचे विमानतळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आणि उदासीनतेमुळे खाली घसरले. बेळगावमधून सुरु असणाऱ्या अनेक विमानसेवा रद्द झाल्या, काही बंद झाल्या. यामुळे व्यवसायासाठी तसेच कामानिमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गरसोय झाली.
बेळगावच्या खासदारपदी निवडून आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पुन्हा एकदा बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, अशी आशा आता जनतेला लागली असून दिल्ली येथे सुरु असणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात खास. जगदीश शेट्टर यांनी उडाण योजनेसंदर्भात मुद्दा मांडला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाला पाठिंबा व्यक्त करताना खासदार जगदीश शेट्टर यांनी आज संसदेमध्ये देशातील स्टार्टअपचे फायदे, महिला सक्षमीकरण, एमएसएमई व रोजगार निर्मिती यावर आपले विचार मांडले. यासह उडाण योजनेचे महत्व पटवून देत बेळगावला तसेच हुबळीसाठी पुन्हा एकदा हि योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात मुद्दा मांडला. तसेच हे सर्व आपल्या देशाच्या विकासाचे प्रमुख स्तंभ असून या चारही स्तंभांना महत्त्व देऊन त्यानुसार अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिनंदन केले.
नवी दिल्ली येथे संसदेत सभापती दिलीप सैकिया यांच्यासमोर आपले विचार व्यक्त करताना खासदार शेट्टर यांनी प्रारंभी आपला परिचय करून देताना आपण बेळगावमधून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलो असल्याचे सांगितले. तसेच अर्थसंकल्पाला पाठिंबा व्यक्त करून ते म्हणाले की, या वेळेचा अर्थसंकल्प गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार प्रमुख स्तंभांवर केंद्रित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत हा दृष्टिकोन आहे. विकसित भारत ही संकल्पना सर्व भारतीयांसाठी एक वचन आहे असे सांगून खासदार शेट्टर यांनी देशातील स्टार्टअपचे फायदे, महिला सक्षमीकरण, एमएसएमई व रोजगार निर्मिती यावर आपले विचार मांडताना हे सर्व आपल्या देशाच्या विकासाचे प्रमुख स्तंभ असल्याचे सांगितले. या चारही स्तंभांना केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिले आहे आणि त्यानुसार अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामुळे मी खूप खुश असून माझा या अर्थसंकल्पाला पाठिंबा आहे. यासाठी मी अर्थमंत्री व पंतप्रधानांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले.
स्टार्टअप हे कल्पना आणि आर्थिक सुपीकतेचे जीवनमान आहेत. ते नवीन कल्पना आणतात, नवीन बाजारपेठ निर्माण करतात आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करतात. हे ओळखून अर्थसंकल्पात स्टार्टअपला महत्त्व देण्यात आले आहे ही चांगली गोष्ट आहे. एंजल टॅक्स हटवणे हे एक उत्तम पाऊल असून ज्यामुळे आमचे स्टार्टर्स यशस्वी होण्यास मदत मिळणार आहे. कृषी क्षेत्रासाठीचे स्टार्ट अप्स शेतकऱ्यांसाठी मदतगार ठरणार आहेत. महिलांसाठीच्या सुविधा आणि प्रकल्पांना महत्व देण्यात आल्यामुळे महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळणार असल्यामुळे हे देखील एक चांगले पाऊल आहे. अर्थसंकल्पात स्थानिक अर्थव्यवस्थेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. स्थानिक अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी निवडक शहरामध्ये रस्त्यावरील खाद्य पदार्थांची 100 केंद्रीय सुरू केली जाणार आहेत. हे देखील खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे अधिक रोजगार उपलब्ध होईल, असे मत खासदार शेट्टर यांनी व्यक्त केले.
मायक्रो स्मॉल अँड मिडीयम इंटरप्राईजेसमुळे राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या पद्धतीने देशात रोजगार निर्मितीचे पंतप्रधानांचे ध्येय अतिशय महत्त्वाचे आहे. या अर्थसंकल्पाने कांही योजना जारी केल्या आहेत. ज्या द्वारे सध्याच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि अनुभव प्राप्त व्हावा यासाठी येत्या पाच वर्षात एक कोटीहून अधिक तरुणांना देशातील आघाडीच्या 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
या अर्थसंकल्पाद्वारे देशातील 1000 औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्ययावत केल्या जाणार आहेत हे देखील एक उत्तम पाऊल असल्याचे सांगून खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारच्या उडान योजनेमुळे कर्नाटकात विशेष करून बेळगाव हुबळी वगैरे विमानतळांचा जो उत्कर्ष झाला आहे त्याची सभागृहाला माहिती दिली. यामुळे बेळगाव विमानतळावरून पुन्हा उडाण योजना सुरु होईल का याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.