बेळगाव लाईव्ह : मुसळधार पावसामुळे नद्या – नाले तुडुंब भरून वाहात असून अनेक ठिकाणी दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
विविध ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहू लागले असून बेळगावहून गोकाककडे जाणारे जवळपास सर्वच रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिणामी आता गोकाककडे जाण्यासाठी एकच सुरक्षित मार्ग नागरिकांना वापरता येणार आहे.
गोकाकमधील लोळसुर पूल आणि गोकाक-कोन्नूरकडे जाणाऱ्या धबधब्याच्या रस्त्यावरील मार्कंडेय नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
बेळगावहून गोकाककडे जाण्यासाठी बेळगाव-पाच्छापूर-शहाबंदर-गोडचिनमल्की-गोकाक हा एकमेव सुरक्षित मार्ग आता वाहतुकीसाठी वापरता येणार असून गोकाकमधील नागरिकांनीदेखील याच मार्गाने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे.
गोकाक मधील नदीकाठच्या भागात पाणी साचले असून पुन्हा पूर आल्याने गोकाकमधील नागरिक चिंतेत आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी पूरग्रस्त भागात तत्परतेने लक्ष देत काटेकोरपणे सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असून पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या तक्रारी आणि सहकार्यासाठी फोनकॉलवरून मदतीसाठी धावत आहेत.