बेळगाव लाईव्ह :पावसाचा ओघ ओसरला असे जाणवत असतानाच पुन्हा एकदा रविवारी संध्याकाळी पावसाने जोर पकडला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी गोकाक, मूडलगी, हुक्केरी, कागवाड, निपाणी, चिक्कोडी तालुक्यातील निवडक अंगणवाडी केंद्रे प्राथमिक आणि माध्यमिक शाळाना सुट्टीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
22 जुलै 2024 पासून अतिवृष्टीमुळे बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अंगणवाडी केंद्र तसेच प्राथमिक माध्यमिक शाळा आणि पदवी पूर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पावसाचा वाढलेला ओघ लक्षात घेता पुन्हा मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. यानंतर पुन्हा बुधवार आणि गुरुवार अशी दोन दिवस वाढीव सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा ओघ वाढतच चालल्याने पुन्हा शुक्रवारी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान शुक्रवारपासून दिवसभरात पावसाचा ओघ कमी झाल्याचे जाणवले, परंतु दिवसभर पावसाची उघडीप आणि सायंकाळपासून मुसळधार पाऊस अशा वातावरणामुळे नदी नाले ओसंडून भरून वाहू लागल्याने या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शनिवारी देखील पुन्हा शाळेला सुट्टी जाहीर केली. सोमवार दिनांक 29 जुलै 2024 पासून पूर्ववत शाळा सुरू होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र रविवार दिनांक 28 जुलै रोजी सायंकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी देखील काही निवडक तालुक्यातील शाळांना पुन्हा सुट्टी जाहीर केली आहे. मात्र बेळगाव आणि खानापूर मधील शाळा उद्यापासून पूर्ववत सुरू होणार आहेत. गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील शाळांना सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर उर्वरित निपाणी, चिकोडी, हुकेरी आणि कागवाड या तालुक्यातील शाळांना सोमवारी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
निप्पाणीतील सिदनाळ, हुन्नरगी, कुन्नूर, ममदापूर केएल, बारवडा, करदगा, हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर, होसूर व बडकुंद्री, कागवाड तालुक्यातील जुगूळ, शापूर, मंगावती, कृष्णा कित्तूर, कात्रोळ आणि बनजवाडा आदी गावातील निवडक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी 29 जुलै आणि 30 जुलै रोजी केवळ चिक्कोडी तालुक्यातील इंगळी, जनवाडा, कल्लोला आणि अंकली गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा आदेश जारी केला आहे.
आजवर ज्या ज्या वेळी अतिवृष्टी झाली, त्यावेळी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परंतु शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्यानंतर पावसाचा ओघ नेहमीच कमी राहिल्याने प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा विद्यार्थ्यांना म्हणावा तितका फायदा झाला नाही. परंतु यंदा प्रथमच योग्यवेळेत अतिवृष्टीमुळे देण्यात आलेल्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले नाहीत.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून चुकलेल्या अभ्यासक्रमाची भरपाई करण्यासाठी मात्र आता शाळांना आणि विद्यार्थ्यांना कंबर कसावी लागणार आहे.