बेळगाव लाईव्ह : आलमट्टी जलाशयात वाढलेली पाण्याची आवक लक्षात घेऊन जलाशयातून पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश बजावले आहेत. जिल्ह्यातील नद्यांमधून, जलाशयातून १.८० लाख क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने आजपासून २ लाख क्युसेक पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, घटप्रभा जलाशयातून १०००० क्युसेकचा नियंत्रित विसर्ग सध्या ८० टक्के क्षमतेवर सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीतीरावरील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यासह पूरग्रस्त भागासाठी सर्व तहसीलदारांना नियोजित ४२७ ठिकाणी निवारा केंद्रे स्थापन झाल्याबद्दल शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले. संभाव्य पुरस्थितीसाठी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पाच बोटी खरेदी आणि सर्चलाइट्स उपलब्ध करून देण्याच्या योजनांसह बोटी सज्ज ठेवाव्यात असेही आदेश देण्यात आले आहेत.
कृष्णा, मलप्रभा आणि घटप्रभा नद्यांच्या काठी पूरग्रस्त गावांमध्ये तपशीलवार निरीक्षण आणि मंगावती, जुगुळ, शिरगुप्पी, कुसनाळ आदी गावांवर सतत देखरेख यासह तहसीलदार, नोडल अधिकारी आणि अग्निशमन व पोलीस कर्मचारी यांना दक्षता ठेवण्याचे कार्य सोपविण्यात आले आहे. पावसामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे आणि मोडकळीस आलेल्या फुटपाथवर बॅरिकेड्स बसवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले. जेथे शक्य असेल तेथे पर्यायी मार्गांचा वापर केला जाईल, परंतु प्रत्येक पुलावर सुरक्षिततेच्या उपायांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले.
राष्ट्रीय महामार्गावर विकासकामे सुरु असून याठिकाणी भूस्खलनाची शक्यता आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी बेळगाव शहरातील नाले आणि गटारींची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना नदीकाठची गावे आणि शेतातील घरांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. भूस्खलनाच्या जोखमीमुळे, विशेषत: संकेश्वर आणि यमकनमर्डीजवळील राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असलेल्या भागांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी अंगणवाड्या आणि शाळांमध्ये अन्नपदार्थांचा साठा ठेवावा, पूरग्रस्त भागातील गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची माहिती ठेवावी असे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी नदीकाठच्या अनेक गावांची पाहणी करून अहवाल दिला. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यासह जनजागृती मोहिमेद्वारे काही भागात मगरींचे अस्तित्व अधोरेखित करून नागरिकांना पाण्यात जाणे टाळण्याचा सल्ला दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, उपजिल्हाधिकारी विजयकुमार होनाकेरी, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, प्रकल्प संचालक मल्लिकार्जुन कलादगी, नागरी विकास कक्ष, विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनीही सहभाग घेतला.