बेळगाव लाईव्ह : मॉर्निंग वॉक साठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर पाठीमागून आलेल्या अस्वलाने हल्ला चढविला. मात्र शेतकऱ्याने या प्रसंगाला धैर्याने सामोरे जात अस्वलाचा सामना केल्याने शेतकरी सुखरूप बचावला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, खानापूर तालुक्यातील लोंढा गावात वास्तव्यास असणारे प्रभू शिनूटगेकर हे सकाळी ६.३० च्या दरम्यान शेतमार्गावर वॉकसाठी गेले होते. याचदरम्यान पाठीमागून आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. वारंवार दोन ते तीनवेळा अस्वलाने हल्ला केल्यानंतर प्रभू शिनूटगेकर यांनी प्रसंगावधानाने आणि धैर्याने अस्वलाचा सामना करत शेजारी पडलेला दगड अस्वलाच्या दिशेने भिरकावला. अस्वलाच्या तोंडावर दगड लागल्याने अस्वल दिशाभूल झाले आणि प्रभू शिनूटगेकर यांची सुटका झाली.
या प्रसंगात प्रभू शिनूटगेकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खानापूर हा भाग चोहोबाजूंनी वनराईने व्यापलेला असून याठिकाणी सातत्याने असे प्रकार घडतात. अस्वलाच्या हल्ल्यानंतर या भागातील नागरिकांमध्ये अस्वलाची दहशत पसरली आहे.