बेळगाव लाईव्ह : गोवावेस, बेळगाव येथील श्री बसवेश्वर उद्यानामध्ये विश्वगुरू बसवण्णा यांची 50 फूट उंचीची मूर्ती स्थापन करावी आणि या उद्यानाचा बंगळुरूच्या धर्तीवर विकास केला जावा, अशी मागणी विविध बसववादी संघटनांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
बेळगाव शहरातील विविध बसववादी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बसवेश्वर महाराजांची मूर्ती आणि बसवेश्वर उद्यानाच्या विकासाच्या संदर्भात बसववादी संघटनांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केळी. शहरात सरकारी अनुदान आणि आमदारांच्या अनुदानातून अनेक संत महात्म्यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत.
मात्र जुन्या काळातील गोवावेस येथील बसवेश्वर सर्कल जवळील बसवेश्वर उद्यानाकडे आणि या उद्यानातील मूर्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोप यावेळी बसववादी संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त करून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच गोवावेसच्या बसवेश्वर उद्यानामध्ये संत बसवेश्वरांची 50 फुटी मूर्ती स्थापन करण्यात यावी आणि बेंगलोरच्या धर्तीवर या उद्यानाचा विकास केला जावा, अशी मागणी यांनी केली.
शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे बसवेश्वर ब्रिज असे नामकरण केले जावे, असा ठराव महापालिकेत संमत करण्यात आला आहे. मात्र अद्याप ब्रिजला संत बसवेश्वरांचे नाव देण्यात आले नाही.
यासंदर्भात तातडीने पाऊले उचलावीत, बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांसमवेत संत बसवेश्वरांचे शिल्प देखील उभारण्यात यावे अशी मागणी यावेळी चन्नबसव फाउंडेशनचे अध्यक्ष शंकर गुडस यांनी केली. याप्रसंगी बहुसंख्य बसववादी कार्यकर्ते उपस्थित होते.