बेळगाव लाईव्ह :अशिलाची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उपस्थित वकिलालाच पोलिसांकरवी अटक करण्याद्वारे आपल्या अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या बदामी मुख्य दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश संजीवकुमार पाच्छापुरे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने एका निवेदनाद्वारे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व कर्नाटक राज्य बार कौन्सिलच्या चेअरमनकडे केली आहे. तसेच वकिलांनी आज आपल्या कामावरही बहिष्कार टाकून बदामी न्यायालयात घडलेल्या त्या घटनेचा निषेध केला.
आपल्या मागणीचे निवेदन सादरबरोबरच मोठ्या संख्येने जमलेल्या बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्य वकिलांनी आज मंगळवारी न्यायालय आवारात जोरदार निदर्शने करून न्यायाची मागणी केली. बदामी येथील प्रधान दिवाणी न्यायाधीश आणि जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश संजीवकुमार पाच्छापूर यांनी गेल्या 20 जुलै 2024 रोजी अनुशासनात्मक कृत्य करत आपल्या अशिलाचे प्रतिनिधित्व करणारे वकील ॲड. पंचय्या ब. मल्लापूर यांना चुकीच्या पद्धतीने पोलीस कोठडी दिली आहे.
बदामी न्यायालयात पिठासीन अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने आमचे वकील बंधू ॲड. पंचय्या मल्लापुर यांना अटक करवण्याच्या या घटनेची योग्य चौकशी करून कारवाई करण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाने यामध्ये मध्यस्थी करावी असा ठराव बेळगाव बार असोसिएशनने संमत केला आहे. तेंव्हा आपल्याला विनंती आहे की आपण तात्काळ बदामी प्रधान दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश संजीवकुमार पाच्छापूर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशा आशयाचा तपशील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि कर्नाटक राज्य बार कौन्सिलच्या चेअरमन यांना धाडलेल्या निवेदनात नमूद आहे.
बदामी प्रधान दिवाणी आणि जेएमएफसी न्यायालयाचे गेल्या 20 जुलै रोजी आमचे एक वकील मित्र ॲड. पंचय्या मल्लापुर एका कौटुंबिक वादाच्या खटल्यात आपल्या पक्षकाराची बाजू मांडत होते. त्यावेळी पक्षकार हजर झाले नाहीत म्हणून त्या न्यायालयाचे न्यायाधीश संजीवकुमार पाच्छापूर कांही कारणास्तव ॲड. मल्लापुर यांना चुकीच्या पद्धतीने पोलिसांकरवी अटक केली. या त्यांच्या कृतीचा आम्ही बेळगाव बार असोसिएशनतर्फे तीव्र निषेध करत आहोत.
या संदर्भात आम्ही कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आमच्या राज्य बार कौन्सिलच्या चेअरमनकडे एका निवेदनाद्वारे ताबडतोब चौकशी करून संबंधित न्यायाधीशांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
तसेच बदामी न्यायालयातील त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज आमच्या कामावर बहिष्कार टाकून बदामी बार असोसिएशनला आमचा पाठिंबा व्यक्त केला आहे, असे एका वकिलाने यावेळी बोलताना सांगितले.