बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील युनियन बँकचे व्यवस्थापक अभिजीत सायमोटे यांच्यासह याच बँकेत 2 वर्षापूर्वी व्यवस्थापक म्हणून काम केलेले कीर्तीराज कदम या उभयतांनी आपल्या वाढदिवसानिमित्त येळ्ळूर ग्रामपंचायतीला 75 पुस्तके भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला.
ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम नुकताच पार पडला. ते यावेळी बोलताना सतीश पाटील यांनी अभिजीत सायमोटे आणि किर्तीराज कदम यांनी ग्रामपंचायतीचे काम जवळून पाहिले आहे.
त्यातून आपण येळ्ळूर गावात काम करत असून आपणही या गावसाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ही पुस्तके ग्रामपंचायतीला भेटीदाखल देऊन सगळ्यांसमोर वाढदिवस कसा साजरा करावा याचं एक अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे, असे सांगितले.
व्यवस्थापक अभिजीत सायमोटे म्हणाले की, मला पहिल्यापासूनच पुस्तकांची आवड आहे. त्यामुळे समोर एक हाच उद्देश होता की वाचन संस्कृती वाढावी. तसेच आपण काय आणि किती देतो? यापेक्षा समाजाला त्याचा कसा उपयोग होतो? हे जास्त महत्त्वाचं असतं. आज पालकांसमोर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मोबाईल आहे. मुलांच्या हातून मोबाईल सुटायचा असेल तर त्यांच्या हातात पुस्तक यायला हवं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट यावेळी त्यांनी सांगितली.
यावेळी व्यवस्थापक किर्तिराज कदम यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्याकडे जो पैसा आहे त्याचा नेहमीच सदुपयोग केला पाहिजे. म्हणजे तो पैसा लोकांना पार्टी देण्याऐवजी अशा नवनवीन उपक्रमांमध्ये खर्च केला पाहिजे. जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल असे सांगून गावातली नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे अभिजीत सायमोटे आणि कीर्तीराज कदम यांचे ग्राम विकास अधिकाऱ्यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच ग्रा.पं. सदस्य, सेक्रेटरी, ग्रंथपाल, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.
व्यवस्थापक अभिजीत सायमोटे व कीर्तीराज कदम यांनी आधीच येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील उपक्रमांची पहाणी केली होती. त्यामुळे या उपक्रमांना प्रेरित होऊन गावाप्रती असलेल्या प्रेम आणि आपुलकीच्या भावनेतून त्याने ग्रा. पं. ग्रंथालयाला पुस्तकं भेट दिली.
या पुस्तकांमध्ये स्वराज्याचा श्री गणेशा – शिवाजी महाराज, स्वराज्याची स्थापना, स्वराज्याचा कारभार, व्यावसायिक म्हैस पालन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे. येळ्ळूर ग्रामपंचायतीने ग्रंथालयांची स्थापना करून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुकही होत आहेच. शिवाय अनेकांनी आजवर येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील उपक्रमांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.