Sunday, September 8, 2024

/

प्रसंगी हायवे बंद पाडू शेतकऱ्यांचा इशारा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बळ्ळारी नाल्याच्या समस्येच्या बाबतीत शेतकऱ्यांची सहनशक्ती आता संपली आहे. आम्ही शेतकरी हातात दोरी सुद्धा घेऊ शकतो आणि विळाही घेऊ शकतो, हे ध्यानात घेऊन सरकार आणि स्थानिक प्रशासनाने बळ्ळारी नाल्याच्या समस्येचे युद्धपातळीवर निवारण करावे अन्यथा आम्ही शेतकरी राष्ट्रीय महामार्ग बंद करून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

बेळगाव शहराला राकसकोप व हिडकल जलाशयातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे कळते, तसे शहरातील सांडपाण्याचा निचऱ्याची व्यवस्था करणे सरकारला कळत नाही का? असा संतप्त सवाल करण्याबरोबरच बळ्ळारी नाल्याच्या समस्येचे युद्धपातळीवर निवारण न केल्यास आम्ही शेतकरी राष्ट्रीय महामार्ग बंद करून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

शेतकरी आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी आगामी सोमवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे आसपासची हजारो एकर शेतजमीन पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासंदर्भात धामणे ब्रिजच्या ठिकाणी आज शुक्रवारी सकाळी बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी नेत्यांनी उपरोक्त इशारा दिला. यावेळी शेतकरी नेते अमोल देसाई म्हणाली की, बळ्ळारी नाल्याच्या पुराची समस्या निकालात काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आता सरकारला जागे करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी फक्त जीव देणे तेवढे बाकी आहे दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे त्याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे.बळ्ळारी नाल्याची समस्या सोडवण्याच्या बाबतीत राज्य व केंद्र सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे पूर्वी खासदार सुरेश अंगडी असताना या नाल्याच्या विकासासाठी 3 कोटी 70 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये 60 टक्के केंद्र सरकार आणि 40 टक्के राज्य सरकारच्या निधीचा समावेश होता. निधी मंजूर झाल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर नारळ फोडून विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र पाऊस सुरू होताच हे काम जे थांबले ते पुन्हा सुरू झालेच नाही आणि मंजूर झालेला निधी फक्त कागदपत्रीच राहिला की कोणाच्या घशात गेला? हे समजू शकले नाही. सरकारी यंत्रणेला आम्ही सांगू इच्छितो की आता आम्हा शेतकऱ्यांची सहनशक्ती संपली आहे. आम्ही शेतकरी आहोत आम्ही हातात दोरी सुद्धा घेऊ शकतो आणि विळाही घेऊ शकतो. तेव्हा प्रशासन सरकारने बळ्ळारी नाल्याची समस्या तात्काळ युद्धपातळीवर निकालात काढावी. अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन संघटितपणे राष्ट्रीय महामार्गावर आमरण उपोषण अथवा साखळी उपोषणाच्या स्वरूपात तीव्र आंदोलन छेडण्याचा विचार आम्ही सुरू केला आहे, अशी माहिती देसाई यांनी दिली.Bellari

विद्यमान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मनावर घेतले तर बळ्ळारी नाल्याचा प्रश्न सुटायला फार वेळ लागणार नाही. तसेच सरकारी यंत्रणेने लक्षात घ्यावं की, बळ्ळारी नाल्याचे विकास काम हे आम्हाला तात्पुरते हंगामी नको तर कालव्याच्या स्वरूपात मजबूत कायमस्वरूपी शाश्वत असे पाहिजे आहे. मागीलवेळी तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपला मतदारसंघ नसतानाही या भागातील शेतकऱ्यांच्या स्नेहापोटी या नाल्याच्या सफाईसाठी वैयक्तिक 7 ते 8 लाख रुपये देऊ केले होते. त्या पैशातून आम्ही दोन पोकलेनने महिनाभर राबवून जेवढं साध्य होईल तेवढी नाल्याची स्वच्छता आम्ही केलं आहे.

त्यासाठी कीर्ती कुमार कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती ही आम्ही स्थापली होती. त्यावेळी आम्ही ते काम केले नसते तर सध्याच्या पावसात बळ्ळारी नाल्यातील सर्व सांडपाणी वडगावच्या घराघरात घुसले असते. हेंबाळकर मॅडमच्या पुण्याईने थोडीफार सफाई झाल्यामुळेच आज बळ्ळारी नाल्याच्या पाण्याचा थोडाफार का होईना निचरा होत आहे. पुरामुळे सध्या एक वितभरही भात पीक शिल्लक नाही.

शेतकरी जीवनमरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे सांगून गेल्या आठ दिवसापासून शेतात पाणी साचून आहे जे आणखी 15 दिवस तसेच राहणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचे? जीव द्यायचा का सांगा? ही कसली लोकशाही? असा सवाल अमोल देसाई यांनी शेवटी केला.Nala

शेतकरी नेते मनोहर हलगेकर म्हणाले की, बळ्ळारी नाल्यातील गाळ काढून त्याची स्वच्छता करण्याबरोबरच या नाल्याचा विकास साधला जावा या शेतकऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या मागणीकडे सरकार व स्थानिक प्रशासन साफ दुर्लक्ष करत आहे खरं तर दरवर्षी पावसाळ्यात या नाल्याचे पाणी शेतजमिनीप्रमाणे शहरातील लगतच्या घराघरांमध्ये देखील शिरत असते. त्यामुळे बळ्ळारी नाल्याच्या पुराची समस्या ही फक्त शेतकऱ्यांची नसून संपूर्ण शहरवासीयांची समस्या आहे. त्यामुळे येत्या काळात आमच्या नेतेमंडळींनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची बैठक घेऊन सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यासारखा एखादा ठोस कार्यक्रम राबविण्याचा विचार आम्ही करत आहोत.

कारण अनेक वेळा अर्ज विनंती करून, निवेदन देऊनही या नाल्याची सफाई आणि विकासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. पूर्वी मी नगरसेवक असताना बळ्ळारी नाल्याचा विषय मी सभागृहात मांडला होता. तत्कालीन मनपा आयुक्तांनी महापालिकडे आवश्यक निधी कमी असल्यामुळे सरकार दरबारी कळवून राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून या समस्येवर नक्की तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. सदर आश्वासन देऊन आता जवळपास 9 वर्ष होत आली मात्र अद्यापही नाल्याची स्वच्छता आणि विकास कामाला सुरुवात होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. यामागे नेमके काय राजकारण आहे? हेच कळेनासे झाले आहे. तेंव्हा येत्या काळात बळ्ळारी नाल्याचा प्रश्न जर निकालात निघाला नाही तर आम्ही सर्व शेतकरी सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बंद करून तीव्र आंदोलन छेडणार आहोत असे हलगेकर यांनी सांगितले.Bellari nala

अन्य एक शेतकरी नेते कीर्तीकुमार कुलकर्णी म्हणाले, सरकारने बेळगाव शहरासाठी राकसकोप जलाशय आणि त्यानंतर हिडकल जलाशयातून पिण्याच्या पाण्याची सोय केली असली तरी शहरातील सांडपाण्याच्या निचऱ्याची सोय कोण करणार? सरकारचे प्रकल्प चांगले नाहीत. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणं कळतं तसं सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे हे सरकारला कळत नाही का? बळ्ळारी नाल्याची समस्या जाणून घेण्यासाठी येणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी प्रत्यक्षात समस्या सोडविण्यासाठी काहीच करत नाहीत. नाल्याच्या बाबतीत राजकारण केले जात असल्यामुळे त्याचा प्रश्न भिजत पडला आहे. जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि नेमलेले अधिकारी जनसेवेचे कार्याच करत नसतील तर त्यांचा काय उपयोग? आमची समस्या जर सुटणार नसेल तर शहराच्या आसपासचे नाले अडवून शहरातील पाण्याचा निचरा थांबवण्यास आम्हाला फार वेळ लागणार नाही.

तथापि बेकायदेशीर कृत्य करण्याचा किंवा जनतेचे हाल करण्याची आमची वृत्ती नाही. तेव्हा सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आमचे आवाहन आहे की त्यांनी आमचा हा बळ्ळारी नाल्याचा प्रश्न सोडवावा त्यांनी तसे केल्यास आम्ही मी व अमोल देसाई स्वखर्चातून या ठिकाणी त्यांचा सव्वा पाच फूट उंचीचा पुतळा उभा करू. तसेच त्या पुतळ्याची देखभाल ही आम्ही स्वखर्चाने करू. लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न सोडवावेत अन्यथा घरी बसावे आम्ही त्यांचे काम करण्यास तयार आहोत, असेही कीर्तीकुमार कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.