बेळगाव लाईव्ह :आपल्या आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे येत्या रविवार दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजता ‘बेळगाव 10 के रन’ या भव्य मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडांगण अर्थात नेहरू स्टेडियम येथून प्रारंभ होणाऱ्या या शर्यतीसाठी आकर्षक बक्षीसे पुरस्कृत करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्य आयोजक कर्नाटकचे पहिले मि. इंडिया, एकलव्य पुरस्कार विजेते माजी शरीर सौष्ठवपटू सुनील आपटेकर यांनी दिली.
शहरातील अयोध्या नगर येथील विजय ऑर्थो अँड ट्राॅमा सेंटर येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मॅरेथॉनबद्दल माहिती देताना सुनील आपटेकर म्हणाले की, तरुणांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्यासाठी 18 ऑगस्ट 2024 रोजी ‘बेळगाव रन’ आयोजित केली जाईल. बेळगाव विभागात ऑलिम्पिक स्तरावर पोहोचण्याची क्षमता असलेले अनेक प्रतिभावंत क्रीडापटू आहेत त्यांना अशा स्पर्धांद्वारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.
तसेच, आपल्यातील अनेक तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत. ज्यामुळे आपल्या समाजाचे नुकसान होत आहे. ‘बेळगाव रन’ ही 10 कि.मी. अंतराची मॅरेथॉन आपल्या तरुणांना वाईट सवयींपासून परावृत्त करून निरोगी सवयींकडे वळवण्याचे पाऊल आहे, असे आपटेकर यांनी सांगितले
मॅरेथॉन शर्यतीसाठी सुंदर टी-शर्ट प्रायोजित करणारे डॉ. रवी पाटील म्हणाले की, ‘मॅरेथॉन हे निरोगी जीवन जगण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे आणि आजकाल प्रत्येकाने निरोगी राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बेळगावातील सर्व नागरिकांनी ‘बेळगाव 10 के रन’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. वयोमानानुसार स्पर्धक कोणताही वयोगट भाग घेऊ शकतो. कारण या मॅरेथॉनमध्ये 3 कि.मी. श्रेणी देखील असून जी चालत पूर्ण केली जाऊ शकते.
ज्यांना त्यापेक्षा दीर्घ शर्यतीत भाग घ्यायचा आहे ते 5 कि.मी. किंवा 10 कि.मी. शर्यतीत सहभागी होऊ शकतात. बेळगाव 10 के रन येत्या 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजता प्रारंभ होईल. ज्यामध्ये 10 कि.मी., 5 कि.मी. आणि 3 कि.मी. अशा तीन श्रेणीतील शर्यतींचा समावेश असेल. ही एक कालबद्ध शर्यत असून सर्व धावपटूंची वेळ आरएफआयडी टायमिंग चिप्सद्वारे नोंद केली जाईल. शर्यतीतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. याखेरीज मॅरेथॉनमध्ये सहभागी सर्व धावपटूंना आकर्षक पदकं, इव्हेंट टी-शर्ट, शर्यतीनंतर नाश्ता, रूट हायड्रेशन सपोर्ट आणि वैद्यकीय सहाय्य दिले जाईल. शर्यत मार्गावर पॅरा-ॲथलीट्ससाठी (दिव्यांग धावपटू) 3 कि.मी. व्हीलचेअर शर्यतीची स्वतंत्र श्रेणी देखील असून जी बेळगावमध्ये प्रथमच आयोजित केली जात आहे.
शालेय विद्यार्थी देखील या शर्यतीमध्ये सहभागी होऊ शकतात. आकर्षक ट्रॉफी जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विविध वयोगट करण्यात आले आहेत अशी माहिती डाॅ. पाटील यांनी दिली. तेंव्हा आपले आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवून ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी सुनील आपटेकर आणि डॉ रवी पाटील यांनी केले. पत्रकार परिषदेला विलास पवार, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते.