Wednesday, December 25, 2024

/

शहरच असेल भकास तर उपनगरांचा कसा होईल विकास?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विकासकामांची परीक्षा घ्यायची असेल तर पावसाळ्यासारखी दुसरी संधी असू शकत नाही. कोट्यवधींच्या निधीतून – अनुदानातून विकासाचा पाढा वाचला जातो. परंतु प्रत्यक्षात हा विकास नेमका कुठे, कसा, कधी आणि कुणी केला? याचे उत्तर मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरीतच आहे.

एकीकडे भरमसाट कर, दुसरीकडे महागाईचे ओझे आणि यापलीकडे कहर म्हणजे मूलभूत सुविधांअभावी होणारी जनतेची परवड! तालुक्यातील मूलभूत सुविधांअभावी जनतेचे हाल तर होतच आहेत. पण स्मार्ट सिटीमध्ये कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा करून जनतेच्या हक्काच्या सुविधाही जनतेला मिळत नाहीत. हे असे चित्र असताना उपनगरांची काय अवस्था असेल याचा विचारच न केलेला बरा….!

सध्या बेळगावमधील अनेक उपनगरे समस्यांच्या विळख्यात अशा पद्धतीने अडकली आहेत, कि ज्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी निर्माण झाली आहे. बेळगाव मधील अमननगर हा भाग देखील यापैकीच एक! ना रस्ते, ना गटारी ना ड्रेनेज.. अशा परिस्थितीत वावरणाऱ्या नागरिकांना आज चक्क चिखलातून एका महिलेचा मृतदेह हातातून घेऊन जाण्याची वेळ आली.

एकीकडे खानापूर तालुक्यातील आमगाव मधील महिलेला तब्बल ४ किलोमीटर पर्यंत उचलून आणून रुग्णालयात दाखल केलेली बाब ताजी असतानाच स्मार्ट समजल्या जाणाऱ्या बेळगावमध्येही अशीच एक घटना समोर आल्याने प्रशासनाच्या बेदरकार कारभावर आता सर्वसामान्य जनता प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागली आहे.

Aman nagar
अमननगर मध्ये चक्क पाण्यातून चालत महिलेचा मृतदेह अंतिम संस्कार साठी नेण्यात आला

खानापूर तालुक्यातील महिलेने आठवडाभर बेळगावमधील रुग्णालयात उपचार घेतले. अखेर आज तिने अखेरचा श्वास घेतला आणि जीवनयात्रा संपविली. तर दुसरीकडे अमननगर परिसरात देखील एका महिलेचा घरातच पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. या महिलेला अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना कुटुंबियांसह अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या नागरिकांचेही हाल झाले.

शेवटी महिलेचा मृतदेह हातातून घेऊन जाण्याची वेळ आली. दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी जरी घडलेल्या असल्या तरी दोन्ही घटनेतील प्रसंग एकमेकाला अनुरूप असेच आहेत. कदाचित मूलभूत सुविधा योग्य पद्धतीने पुरविण्यात आल्या असत्या तर दोन्ही महिलांचा जीव वाचविण्यात यशही आले असते. मात्र स्वतःच्याच धुंदीत बेदरकारपणे वावरणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे जनतेची मात्र दैना उडत आहे हे कुणाच्याच निदर्शनात येईनासे झाले आहे.

गेल्या वर्षभरात अनेकवेळा नागरिकांनी स्मार्ट सिटी आणि एकंदर प्रशासकीय कामकाजावरून नाराजी व्यक्त केली आहे. हळहळू जनता रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहे. जनतेचा उद्रेक होण्यापूर्वी प्रशासकीय यंत्रणेने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.