बेळगाव लाईव्ह : सोशल मीडियातील एका पोस्टमुळे चुकीचा पण गोष्टी घडतात आणि चांगल्या पण गोष्टी घडतात हे सर्वश्रुत झाले आहे. मदतीच्या आवाहनाची व्हाट्सअप ग्रुप वरील एका पोस्टमुळे पीडित कुटुंबाला जवळपास साडेचार लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
नैऋत्य रेल्वेच्या तिकीट तपासणीस श्रेणीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत दीड -दोन महिन्यापूर्वी रेल्वेतील चाकू हल्ल्यात ठार झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गरीब कुटुंबाला तब्बल सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
गेल्या दीड -दोन महिन्यापूर्वी लोंढा -खानापूर दरम्यान रेल्वेतील चाकू हल्ल्यात कंत्राटी रेल्वे कर्मचारी झांशी येथील देवर्षी वर्मा हा ठार झाला होता. मृत्युमुखी पडलेल्या देवर्षी वर्मा याची घरची परिस्थिती गरिबीची आहे.
याबाबतची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या तिकीट तपासणीस श्रेणीच्या व्हाट्सअप ग्रुपवर मयत वर्मा याच्या कुटुंबाला आपण मदत केली पाहिजे. आपण कशाप्रकारे मदत करू शकतो? अशा पद्धतीचा एक संदेश टाकला होता. त्याला प्रतिसाद देत सर्व तिकीट तपासणी व अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशातून सुमारे 4 लाख 50 हजार रुपयांचा मदत निधी उभा केला.
तसेच मयत देवर्षी वर्मा याच्या सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या आईला बोलावून घेऊन हे आर्थिक सहाय्य तिला देण्यात आले. नैऋत्य रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ कमर्शियल मॅनेजर सत्यप्रकाश शास्त्री यांनी सदर निधी वर्माच्या आईकडे सुपूर्द केला. यावेळी नैऋत्य रेल्वेचा अधिकारीवर्ग उपस्थित होता.
भारतीय रेल्वे खात्यातील कर्मचाऱ्यांची संख्या देशात सर्व विभागांपैकी सर्वात मोठी संख्या आहे जवळपास हा आकडा लाखोंच्या घरात जातो त्याच रेल्वे खात्याच्या तिकीट तपासणीच्या एका व्हाट्सअप ग्रुप मधील केलेल्या भावनिक पोस्ट नंतर कुटुंबाला साडेचार लाख रुपयांची मदत मिळाली आहे हे सोशल मीडियाचे पॉझिटिव्ह दृष्टिकोनाच्या फायद्याचा एक प्रकार आहे.
सरकार मदत द्यायच्या अगोदर रेल्वे तिकीट तपासणीस कर्मचाऱ्यांनी गोळा करून दिलेली ही मदत माणुसकी जपणारी आणि कौतुकास्पद देखील आहे. अशीच मदत विविध खात्यातील कर्मचाऱ्यांनी जर केली तर….?