बेळगाव लाईव्ह :गेल्या सलग चार-पाच दिवसात झालेल्या पावसामुळे बेळगाव शहराच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत सध्या दीड फुटाने वाढ झाली असल्याची माहिती एल अँड टी कंपनीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी दिली आहे. त्यामुळे या जून महिन्यातील संभाव्य पाणीटंचाईचे संकट तुर्तास कळले असले तरी पाणीपुरवठा आठ दिवसाआडच सुरू राहणार आहे.
गेल्या कांही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे राकसकोप जलाशय परिसरातील नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. परिणामी जलाशयातील पाण्याची आवक वाढली आहे.
गतवर्षी 11 जून रोजी जलाशयाची पाणी पातळी 2,449.65 फूट होती ती यंदा याच दिवशी 2,452.55 फुट इतकी झाली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा जून महिन्यात जलाशयात अडीच फूट पाणी अधिक आहे. एकंदर राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे जूनमध्ये शहराला पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.
यंदा जून महिना पूर्ण कोरडा जाणार अशी परिस्थिती होती. तसेच राकसकोप जलाशयातील पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल अशी माहिती कंपनीने दिली होती. याखेरीस महापालिकेने पाण्याचा वापर जपून करण्याचे जाहीर आवाहन केले होते.
तथापि यंदा बऱ्यापैकी वळीव पाऊस पडल्यामुळे दिलासा मिळाला आहे गेल्या चार-पाच दिवसात पडलेल्या सलग पावसामुळे प्रवाहित झालेल्या पाण्याच्या लहान मोठ्या स्त्रोतांमुळे राकसकोप जलाशयातील पाण्याची आवक वाढली आहे. यासंदर्भात बोलताना एल अँड टी कंपनी बेळगावचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी यंदा जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळी दीड फुटाने वाढ झाली आहे.
त्यामुळे शहराला जूनमध्ये पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे असे सांगून सुरुवातीपासूनच पाण्याचे योग्य नियोजन व गळती निवारण्याला प्राधान्य दिल्याने यंदा पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाल्याचे स्पष्ट केले.