बेळगाव लाईव्ह : बेळगावसह उपनगरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून या रस्त्यांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यांची डागडुजी पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावी, अशी मागणी नागरिकांनी कित्येकवेळा करूनही दुर्लक्ष करण्यात आले.
परिणामी या रस्त्यांमुळे समस्यांमध्ये भर पडत असून आज वाघवडे रोड, मच्छे येथे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात एका व्यक्तीचा दुचाकीवरून पडून अपघात झाला आहे.
सुदैवाने सदर व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. मात्र या रस्त्यावरील रहदारी पाहता भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाघवडे रोड, मच्छे येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाला निवेदन देखील सादर करण्यात आले आहे.
मच्छे-वाघवडे रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून येथील वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. मच्छे-वाघवडे रस्त्यावर औद्योगिक वसाहत असल्याने विविध कारखान्यांत हजारो कामगार कार्यरत असून या रस्त्यावर बरीच वर्दळ असते.
या सोबत कारखान्यांना कच्चा माल पुरवठा करण्यासाठी अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्ती करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मच्छे व वाघवडे रस्त्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे औद्योगिक कारखाने आहेत. या रस्त्यावरून स्थानिक वाहनधारकांबरोबर कारखान्यांना जाणाऱ्या कामगार वर्गांचीही वर्दळ असते. औद्योगिक वसाहतीजवळच्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. मच्छे, वाघवडे, संतिबस्तवाड या भागातील वाहनधारकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. सध्या रस्त्याची परिस्थिती पाहता दुचाकी चालविणेही कठीण बनले आहे. औद्योगिक वसाहतीत रात्रीच्यावेळी या रस्त्यावरून कामगार वर्गाला ये-जा करावी लागते.
त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच रस्त्याचे कामकाज सुरू करण्याची गरज आहे. या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास येथील कामगार वर्ग व स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. आज झालेल्या अपघाताची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने या रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा खानापूर – बेळगाव मुख्य रस्त्यावर आंदोलन करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.