बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्यातील वनीकरण वाढविण्याच्या दृष्टीने यावर्षी सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून 1 लाख 67 हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.
त्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायतींना रोपे पाठवली जाणार असून मोकळ्या जागा, शाळांचे आवार, सरकारी इमारतींचे आवार आणि रस्त्यांच्या दुतर्फा ही रोपे लावली जाणार आहेत, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षणाधिकारी के. एस. गोरवर यांनी दिली आहे.
शासनाच्या ‘कोटी वृक्ष अभियान’ योजनेअंतर्गत जिल्हा पंचायत, फलोत्पादन खाते, वनखाते, सामाजिक वनीकरण विभागातर्फे 5 वर्षात जिल्ह्यात विविध प्रकारच्या झाडांची 1 कोटी रोपे लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
याचाच एक भाग म्हणून यावर्षी 1 लाख 67 हजार रोपे लावली जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा, असेच स्मशानभूमी, जंगल, शेती, बागायत, महसूल आणि आरोग्य खात्याच्या मोकळ्या जागा, सरकारी प्राथमिक शाळा, विविध शासकीय खात्यांचे आवार, जिल्ह्यातील सर्व एपीएमसी आवार या ठिकाणी ही रोपे लावली जाणार आहेत.
दरम्यान ग्रामीण भागात फळांच्या रोपांची मागणी वाढली आहे. जांभूळ, आंबा, फणस, चिकू, डाळिंब, लिंबू, रक्तचंदन, चंदन अशा अनेक प्रकारची रोपे शेतकऱ्यांकडून मागविले जात आहेत. यावर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने वनीकरण वाढविण्याच्या दृष्टीने कामे हाती घेतली जात आहेत.