बेळगाव लाईव्ह : रहदारी विभागाने एकामागून एक मोहिमा उघडत कारवाईचा सपाटा सुरु केला खरा.. परंतु आले ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी परिस्थिती या मोहिमांची दिसून येत आहे.
गेल्या पंधरवड्यात रस्त्यावरील फेरीवाल्यांना शिस्त लावणे, व्यावसायिकांनी केलेली अतिक्रमणे हटवून वाहतुकीतील अडथळा दूर करणे, नंबर प्लेट संदर्भातील कारवाई, पार्किंग, वन वे, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वर्दीतल्या रिक्षाचालकांवरील कारवाई, हेल्मेट, वाहतूक नियम भंग, सिग्नलवर जनजागृती मोहीम यासह विविध कारणांवरून हाती घेतलेल्या मोहिमेतून बेळगावच्या रहदारीला शिस्त लागेल अशी अपेक्षा होती. मात्र ‘पुढचे पाठ.. मागचे सपाट…’ अशीच काहीशी परिस्थिती पुन्हा दिसून येत आहे.
वाहतूक विभागाच्या वतीने शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हाती घेतलेली कारवाईची मोहीम हि कौतुकास्पदच आहे. परंतु या मोहिमेतील सातत्य फारकाळ टिकून न राहिल्याने पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती दिसून येत आहे.
वर्दीतल्या रिक्षामामांनी पुन्हा भरगच्च विद्यार्थ्यांची वाहतूक सुरु केली आहे. तर एकीकडे लावलेल्या पार्किंगच्या शिस्तीला दुसरीकडच्या मार्गावर ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. एकाच मार्गावर कारवाई करून इतरत्र दुर्लक्ष केल्यास शहरातील वाहतुकीला शिस्त लागणे कठीण आहे. यामुळे ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ याप्रमाणे वाहतूक विभागाच्या कारवाईला गृहीत धरून वाहतूक पोलिसांची पाठ फिरली कि पुन्हा नागरिक जैसे थे परिस्थितीत येतात. वाहतूक विभागाने हाती घेतलेली कारवाई हि कौतुकास्पद आहेच. परंतु या कारवाईत सातत्य राखून बेळगाव शहराच्या वाहतुकीला कडक शिस्त लावणे गरजेचे आहे.
बेळगाव रहदारी विभाग पोलिसांनी आखलेल्या या मोहिमेबरोबरच अनेक वाहनातून मोठ्या प्रमाणात निघणारे धूर, अल्पवयीन मुलांकडून चालविण्यात येणारी वाहने यासह इतर बाबीतही लक्ष पुरवून वाहतुकीच्या समस्या मार्गी लावण्याची आणि या कारवाईत सातत्य राखून रहदारी विभागाच्या कडक शिस्तीची जाणीव जनतेला करून देणे अत्यावश्यक आहे.