बेळगाव लाईव्ह:गोवावेस अर्थात संत बसवेश्वर सर्कल येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडल्यामुळे आज मंगळवारी सकाळी स्वतः महापालिका आयुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेण्याबरोबरच सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली आहे.
गोवावेस सर्कल येथील व्यापारी संकुलात बेळगाव महापालिकेचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या अखत्यारीत क्र. 1 ते 26 पर्यंतचे प्रभाग येतात. या कार्यालयात पुन्हा एकदा चोरी झाल्याचा प्रकार काल सोमवारी सकाळी उघडकीस आला.
चोरट्याने कार्यालयाचा मागील दरवाजा फोडून आज प्रवेश करण्याद्वारे कार्यालयातील विविध साहित्य आणि कागदपत्र अस्ताव्यस्त केल्याचे आढळून आले आहे. कार्यालयातील लॅपटॉप व अन्य वस्तूंची चोरी झाल्याचा संशय आहे.
चक्क महापालिका कार्यालयात दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार घडल्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच उपस्थित मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
यापूर्वी देखील गोवावेस येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात चोरीचा प्रकार घडला होता. त्यावेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली होती. मात्र त्यानंतर चोरट्यांचा तपास वगैरे कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे समजते.
मात्र आता त्यानंतर पुन्हा चोरीचा प्रकार घडल्यामुळे महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने होणाऱ्या या चोरीच्या प्रकाराचे गांभीर्य आज सकाळी कार्यालयाला भेट देणाऱ्या मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या संदर्भात पोलिसांना सत्वर कारवाई करण्यास सांगावे, अशी विनंती केली.
मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी देखील आपल्या अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या तक्रार वजा विनंतीची गांभीर्याने दखल घेत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे.
दरम्यान आता दुपारी गोवावेस येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून पोलिसात दुसऱ्यांदा घडलेल्या चोरीची रीतसर तक्रार नोंदवली जाणार असल्याचे समजते.