बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील मळेकरणी देवस्थानाला प्राणी दया संघटनेचे दयानंद सरस्वती स्वामी यांनी भेट दिली.
बेळगाव तालुक्यातील मळेकरणी देवस्थानात पशुहत्या बंदी करण्यात आल्यानंतर देवस्थानाचे हक्कदार आणि ग्रामपंचायतीत परस्पर कलगीतुरा सुरु आहे.
गावात होणारी अस्वच्छता, पशुहत्येमुळे गावात पसरलेली दुर्गंधी यासह प्रत्येक आठवड्यात मंगळवार आणि शुक्रवारी होणाऱ्या यात्रा यामुळे गावातील वातावरणावर होणारा परिणाम या कारणास्तव श्री मळेकरणी देवस्थान परिसरात पशुहत्येवर बंदी घालण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर आज प्राणी दया संघटनेचे दयानंद सरस्वती स्वामी यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, देवस्थानाच्या समोर पशुबळी साठी करण्यात येणारी व्यवस्था बेकायदेशीर आहे. याठिकाणी पशुबळी देण्यात आल्यास मंदिराचे पुजारी, विश्वस्तांना कारागृहात जाण्याची वेळ येईल. मंदिराच्या समोरच नाही तर कुठेही प्राणिहत्या करणे योग्य नाही.
यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश देखील दिला आहे. रक्ताचा एक थेंबदेखील पडला तरी तातडीने अटक करण्यात येते. देवस्थानात मनोभावे पूजा केली पाहिजे. उचगावमध्ये दर शुक्रवार आणि मंगळवारी होणारी यात्रा आणि या यात्रेमुळे देवाच्या नावावर देवस्थान परिसर तसेच गावामध्ये होणारे अनुचित प्रकार रोखणे गरजेचे आहे
. ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून भविष्यात श्री मळेकरणी देवस्थान ‘स्वच्छ मंदिर, स्वच्छ यात्रा, स्वस्थ मंदिर आणि दिव्य मंदिर’ या घोषवाक्याखाली कार्य करावे. देवस्थान दिव्यालय बनणे गरजेचे असताना देवालय वधालंय आणि खुनालंय बनले आहे, याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
यावेळी दयानंद सरस्वती स्वामी यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.