बेळगाव लाईव्ह: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार बस सेवेची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्या अनुषंगाने बसेसची संख्या वाढवावी, या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
उपरोक्त मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज बुधवारी संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्यात आले आहे. अभावीप बेळगाव शहर व जिल्हा शाखेतर्फे देखील आज सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा करण्यात आला.
सदर मोर्चामध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी हातात अभावीपचे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बसेसची सोय करावी या मागणीसह परिवहन मंडळासह सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या.
अग्रभागी अभावीपचे ‘स्टुडन्ट पाॅवर नेशन पाॅवर’ हे बॅनर धरलेल्या विद्यार्थिनींसह रस्त्यावरून घोषणा देत निघालेला हा भव्य मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. मोर्चा चन्नम्मा सर्कल येथे येताच त्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मानवी साखळी करून रास्ता रोको केला.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अल्प काळ विस्कळीत झाली होती. या ठिकाणी अभावीपच्या नेत्यांनी आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगता होऊन त्या ठिकाणी सरकारच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.