बेळगाव लाईव्ह :राज्यातील इयत्ता दहावीच्या दुसऱ्या पुरवणी परीक्षेला आज शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून येत्या शनिवार दि. 22 जूनपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 23 हजार 61 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
राज्यातील दहावी परीक्षा -1 मध्ये बेळगाव आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांचा निकाल अनुक्रमे 64.93 टक्के व 69.82 टक्के लागला आहे. या पद्धतीने राज्यात चिक्कोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्हा अनुक्रमे 25 व 29 व्या स्थानावर आहे.
आज पासून सुरू झालेल्या दहावी पुरवणी परीक्षा -2 साठी बेळगाव जिल्ह्यातील 23 हजार 61 विद्यार्थ्यांनी नांव नोंदणी केली असली तरी 740 विद्यार्थी या परीक्षेपासून अलिप्त राहिले आहेत. जिल्ह्यात दहावी परीक्षेचा निकाल सुधारावा यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विशेष वर्ग भरवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
तथापि या विशेष वर्गांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद लाभत नसल्याची शिक्षकांची तक्रार आहे. दहावी परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन वेळा संधी मिळणार आहे. पहिल्या प्रयत्नात अनुत्तीर्ण झालेल्या तसेच कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे यासाठी शिक्षण खाते जागृती करत आहे.
शिक्षण खात्याचे अधिकारी व शिक्षक प्रयत्न करत असले तरी आजपासून सुरू झालेल्या दहावी -2 परीक्षेसाठी नोंदणी करण्यात 740 विद्यार्थ्यांची नकारघंटा दिसून आली आहे. दहावी वार्षिक परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात विविध विषयांमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी निकाल सुधारण्यासाठी परीक्षा -2 मध्ये नोंदणी केली आहे.
यातील अनेक जणांनी गणित आणि विज्ञान विषय निवडले आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केले नाही अशा विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा -3 मध्ये हजर राहण्यासाठी जागृती करण्याचे काम आता शिक्षण खात्याकडून होणार आहे.