बेळगाव लाईव्ह: बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हे केवळ विद्यमान खासदार नसून कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे देशात स्थापन होणाऱ्या एनडीए सरकार मध्ये कर्नाटक राज्याच्या कोट्यातून बेळगावच्या खासदारांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांनी विजय मिळवत लोकसभेत प्रवेश मिळवला आहे. केंद्रात सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपने आपल्या मित्र पक्षांसोबत (एनडीए) नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून रविवारी मोदी यांचा मंत्रिमंडळासह शपथविधी होणार आहे.
मोदी यांच्या मंत्रिमंडळात कर्नाटकातून जवळपास पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री, हावेरीचे खासदार बसवराज बोम्मई, धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी, बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, बेंगळुरूच्या खासदार शोभा करंदलाजे आणि मंजुनाथ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री कै. सुरेश अंगडी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या अगोदर भाजपकडूनच बाबागौडा पाटील हेदेखील राज्यमंत्री बनले होते. आता बेळगावचे खासदार म्हणून विजयी ठरलेले जगदीश शेट्टर यांचीदेखील मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.