बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरामध्ये आज गुरुवारी विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांद्वारे श्री शनी जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
श्री शनि जयंतीनिमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरामध्ये आज पहाटे सूर्योदयाला श्री शनि जन्मोत्सव आणि त्यानंतर पाळणा झाला. त्यानंतर श्री शनि देवांना रुद्राभिषेक, तैला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शनी शांती, शनी होम, तीळ होम वगैरे विविध धार्मिक विधी पार पडले.
यावेळी जगामध्ये शांतता, सुख -समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना व विशेष पूजा करण्यात आली. वेदशास्त्र संपन्न नागेश उर्फ बाळू देशपांडे यांनी सर्व धार्मिक विधींचे पौरोहित्य केले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त आनंद अध्यापक, प्रकाश अध्यापक, विलास अध्यापक व निरंजन अध्यापक उपस्थित होते. श्री शनि जयंतीनिमित्त पहाटेपासून पाटील गल्ली शनी मंदिरात देवदर्शन व पूजा -अभिषेक यासाठी भाविकांची भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे मंदिरा बाहेर भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत. आज सकाळी शहरातील अनेक मान्यवरांनी श्री शनी मंदिराला भेट देऊन देवदर्शन व आशीर्वाद घेतले. सर्व भक्तांना सकाळपासून दिवसभर प्रसादाचे वाटप केले जात आहे.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना शनी मंदिराचे विश्वस्त व पुजारी विलास अध्यापक म्हणाले की, आज श्री शनि जयंती आहे. आज पहाटे सूर्योदयावेळी श्री शनि महाराजांचा जन्म झाला आहे. श्री शनि जयंती निमित्त पाटील गल्लीतील अध्यापक कुटुंबीयांच्या या अतिशय प्राचीन व जागृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री शनी मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे सूर्योदयाला श्री शनि महाराजांचा जन्मोत्सव व पाळणा झाला. त्यानंतर श्री शनि महाराजांना तैला अभिषेक आणि रुद्राभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मंदिरात श्री शनी शांती, तीळ होम वगैरे विविध धार्मिक विधी पार पडले. सध्या जगामध्ये जी अशांतता निर्माण झाली आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहेत, तर कांही ठिकाणी दहशतवादी कारवाया सुरू आहेत. हे सर्व थांबून संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी. माणसा माणसातील वैर संपुष्टात यावे आणि संपूर्ण जगात शांती, समृद्धी नांदू दे. आता लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. मान्सूनचा पाऊस चांगल्या प्रकारे पडू देत, जेणेकरून बळीराजाला चांगले दिवस येऊ देत. शेतकऱ्याला चांगले दिवस आले तर सर्वसामान्य जनतेला अन्नधान्य परवडणाऱ्या दरात मिळणार आहे असे सांगून याखेरीज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा येत्या 8 जून रोजी नव्याने पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
हा त्यांचा पंतप्रधान पदाचा तिसरा कालावधी यशस्वीरित्या पार पडू दे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारत एक महासत्ता म्हणून उदयास येऊ देत. तसेच संपूर्ण भारतातील जनतेला उत्तम आरोग्य, आयुर्व आणि ऐश्वर्य लाभू दे यासाठी आज श्री शनि महाराजांच्या चरणी प्रार्थना व विशेष पूजा देखील करण्यात आली आहे, अशी माहिती विश्वस्त विलास अध्यापक यांनी दिली.