बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाची विकास कामे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्या. त्यांच्या अडीअडचणींचे निवारण करा, अशी सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज अधिकाऱ्यांना केली.
बेळगाव महापालिकेत आज बुधवारी सकाळी झालेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यासाठी यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड, घनकचरा व्यवस्थापन युनिट, चोवीस तास पाणी योजना (24×2) यासह मंजूर झालेल्या मोठ्या प्रकल्पांची माहिती देण्याबरोबरच मंत्र्यांनी कांही ठिकाणी विकास कामांना स्थानिकांचा विरोध होतो.
अशा वेळी स्थानिकांचे मन वळवले पाहिजे. प्रसंगीआवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तात कामे सुरू ठेवावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
भूसंपादन आणि स्थानिकांचा विरोध यामुळे काही प्रकल्प 10 वर्षांपासून रखडले आहेत. मात्र त्यामुळे जनतेला चांगल्या सुविधा देणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली सर्व लवकरात लवकर कामे पूर्ण करावीत. डेंग्यू आणि कॉलरा नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. भ्रूणहत्येवर बारिक लक्ष ठेवले जावे असे सांगून अखंड पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी ठेकेदार संस्थेच्या अधिकाऱ्यांना दिले.
जुना पी.बी.रोड, सिव्हिल हॉस्पिटलजवळील रस्ता व पाईप लाईनची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे जनतेला त्रास होत असल्याबद्दल आमदार असिफ (राजू) सेठ यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उड्डाणपुलाचा सुधारित आराखडा सादर करण्याची सूचना केली.
बैठकीस सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी नितेश पाटील, महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते.