बेळगाव लाईव्ह:अवैज्ञानिक व निकृष्ट बांधकामामुळे कोसळलेल्या गटारी आणि जुन्या गळती लागलेल्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे सध्या सह्याद्री कॉलनी, भाग्यनगर येथील रहिवाशांना प्रचंड त्रास -मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच युद्धपातळीवर येथील गटारांची साफसफाई व दुरुस्ती करून गळती लागलेले ड्रेनेजचे पाईप बदलावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 51 मध्ये येणाऱ्या सह्याद्री कॉलनी, भाग्यनगर येथील गटार आणि ड्रेनेज व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे. अलीकडच्या काळात येथील गटारीचे बांधकाम करण्यात आले असले तरी ते इतके निकृष्ट दर्जाचे झाले आहे की अल्पावधीत बऱ्याच ठिकाणी बांधकाम ढासळून दगड, सिमेंट -माती गटारात पडली आहे.
तसेच रस्त्याखालील गटारी पूर्णपणे बुजल्या आहेत. परिणामी निचरा न झाल्यामुळे गटारींमध्ये सांडपाणी आणि घाण केरकचरा तुंबण्याबरोबरच झाडे -झुडपे वाढली आहेत. भरीसभर म्हणून येथील जुन्या झालेल्या ड्रेनेज पाईपलाईनला गळती लागून त्यांचे घाण सांडपाणी गटारीत येत आहे.
गटारींप्रमाणे कॉलनीतील तीनही रस्त्यांच्या ड्रेनेज पाईपलाईनमध्ये गाळ साचून सांडपाण्याचा निचरा होणे बंद झाले आहे. सांडपाण्याने तुंबलेल्या या जुन्या ड्रेनेज पाईपलाईनला गळती लागून त्याचे पाणी गटारांमध्ये येण्याबरोबरच एका ठिकाणी रस्त्याशेजारी ड्रेनेजच्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे छोटे तळेच निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारामुळे कॉलनीतील नागरिकांचे विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याखेरीज सांडपाण्याने तुंबलेल्या गटारी लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत. गटारी व ड्रेनेजच्या या समस्येसंदर्भात वारंवार तक्रार केल्यानंतर परवा महापालिकेचे कर्मचारी गटार स्वच्छतेसाठी सह्याद्री कॉलनीत दाखल झाले होते. मात्र छोट्या जेसीबीने गटारीची स्वच्छता करताना त्यांनी तेथील जमिनीखालील गॅस पाईपलाईन फोडून ठेवली. परिणामी गॅस गळती दुरुस्त होईलपर्यंत स्वयंपाकाला गॅस नसल्यामुळे कॉलनीतील गृहिणीवर्गाला कांही काळ मनस्ताप सहन करावा लागला.
तसेच त्यामुळे गटार स्वच्छता ही थांबल्याचे समजते. येथील तुंबलेल्या धोकादायक गटारीमुळे दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. सध्याच्या डेंग्यू वगैरेची साथ सुरू असलेल्या काळात सायंकाळनंतर सह्याद्रीनगरवासियांना डासांचा प्रचंड उपद्रव सहन करावा लागत आहे.
त्यामुळे त्यांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तरी लोकप्रतिनिधीसह महापालिका आयुक्त आणि मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी. किमान सह्याद्री कॉलनी येथील गटारींची प्रामुख्याने रस्त्याखालील गटारीची स्वच्छता करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.