बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीचे दर्शन घेऊन शिवमोग्गा येथे परतणाऱ्या मिनी बसला झालेल्या भीषण अपघातात 13 जण ठार झाल्याची घटना हावेरी तालुक्यातील ब्याडगी या गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमोग्गाहून मिनी बसने काही भाविक सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आले होते. देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहळ्ळी क्रॉसजवळ बस चालकाला झोप आल्याने पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून मिनी बसने जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा चक्काचूर झाला. अपघातामध्ये बसमधील १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता कि अडकलेल्या मृतांचे मृतदेह बाहेर काढणे देखील कठीण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
मृतांमध्ये ७ महिलांचा समावेश असून बसचालक आदर्श (२३), परशुराम (४५), भाग्या (४०), नागेश (५०), विशालाक्षी (४०), अर्पिता (१८), सुभद्राबाई (६५), पुण्य (५०), मंजुळाबाई, मनसा (२४), रूपा (४०), मंजुळा (५०) यांचा समावेश आहे.
सर्वजण शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील एमेहट्टी गावचे रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आणखी चौघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते आहे.
मृतांमधील नागेश आणि विशालाक्षी यांच्या मुलाने (आदर्श) नवीन टेम्पो ट्रॅव्हलर हे वाहन घेतले होते. हे कुटुंब सोमवारी शिमोगाहून निघाल्यानंतर तिवारी लक्ष्मी मंदिरात पोहोचले.
आपल्या नवीन वाहनांची पूजा करून तुळजा भवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथून पुढे कलबुर्गी जिल्ह्यातील मायम्मा मंदिरात दर्शन घेऊन सौंदत्ती येथे रेणुकादेवीचे दर्शन घेऊन पुन्हा शिवमोग्गाकडे परतताना हा अपघात झाला.