बेळगाव लाईव्ह: शुक्रवारी सायंकाळी जवळपास दोन तासाहून अधिक तास बेळगाव शहर परिसराला पावसाने जोरदार हजेरी दिल्यानंतर शनिवारी पूर्ण दिवसभर पाऊस आणि उसंत घेतली होती.
रविवारी देखील पाऊस दुपारपर्यंत नव्हताच मात्र हवामान खात्याने आगामी चार दिवसात बेळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून बेळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे येत्या चार दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मंगळूर, कारवार, उडपी आणि कोडगू या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने त्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच बिदर, बेळगाव, कलबुर्गी आणि म्हैसूर जिल्हामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या ठिकाणी येलो अलर्टची घोषणा करण्यात आली आहे.
याखेरीज शिमोगा, चिक्कमंगळूर व चिक्कबेळ्ळापूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बागलकोट, गदग, हावेरी, धारवाड, रायचूर, विजयपूर, विजयनगर, कोप्पळ, चित्रदुर्ग, हासन दावणगिरी, मंड्या व रामनगर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाला सुरुवात झाल्याचे समजते.